आयुक्त नितीन कापडणीस; शंभर टक्के दंड व व्याज माफीचा लाभ घ्या
प्रतिनिधी / सांगली
घरपट्टी कर एकरकमी भरल्यास त्यावरील दंड व व्याज १०० टक्के माफ करण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. ३१ मार्च पूर्वी घरपट्टी कर भरावा, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. दरम्यान १ मार्च पासून कर वसुलीसाठी धडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही आयुक्त कापडणीस यांनी दिला आहे.
महापूर तसेच कोरोनामुळे सर्व समान्यांसह व्यापारी, व्यावसायिकांना जबर फटका बसला. त्यांचे आर्थिक गणित कोलमडले. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने नागरिकांना दिलासा देण्यासाठी ३१ मार्च अखेर एकरकमी मालमत्ता कर भरणाऱ्याना दंड व व्याजात १०० टक्के सूट देण्याचा प्रस्ताव तयार करून तो महासभेसमोर ठेवला होता. नुकत्याच झालेल्या महासभेत एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत बोलताना आयुक्त कापडणीस म्हणाले, यासाठी ‘अभय योजना’ सुरू करण्यात आली आहे.
३१ मार्च पर्यन्त ता योजनेची मुदत आहे. नागरिकांनी एकरकमी मालमत्ता कर भरल्यास त्यांना दंड व व्याजात १०० टक्के माफी दिली जाणार आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. थकीत मालमत्ता कर भरावा. दरम्यान १ मार्च पासून कर वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी थकीत मालमत्ता कर भरावा, असे आवाहनही कापडणीस यांनी केले आहे.