आदेश मागे घेण्यासाठी सरकारला शुक्रवारचा अल्टीमेट
प्रतिनिधी / मिरज
पुढील आठवड्यात गुढीपाडवा सण असल्याने सर्व व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मालाची आयात करुन ठेवली आहे. कोरोनामुळे मागील वर्ष वाया गेले असल्याने यंदा पूर्ण क्षमतेने व्यवसाय करण्यासाठी परवानगीची अपेक्षा होती. मात्र, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने छुप्या पध्दतीने नियम लागू करुन व्यापाऱ्यांना संकटात ढकलेले आहे. त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेल्या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. शुक्रवारपर्यंत शासनाने लॉकडाऊनचा आदेश मागे घ्यावा, अन्यथा शासन आदेश झुगारुन व्यवसाय सुरू करु, असा इशारा शहरातील व्यापाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
व्यापारी संघटनेचे विवेक शेटे, यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांनी प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे यांना निवेदन दिले. सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची चेन तुटत आहे. परिणामी शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. दरम्यान, शहरातील सराफ व्यवसायिकांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे. मिरज सराफ – सुवर्णकार समितीचे सदस्य ओंकार शिखरे यांनी म्हणाले, वर्षभर आम्ही सर्व व्यापारी कोरोनाशी झुंज देत आहोत. ब्रेक द चेनमध्ये सरकारने अत्यावश्यक सेवेअंतर्गत चालू ठेवलेल्या इतर सर्व सोयीसुविधांसाठी नागरिक रस्त्यावर येणार आहेतच, तर खऱ्या अर्थाने ही कोरोनाची चेन ब्रेक होणार आहे का ? सरकार कोरोना ऐवजी व्यापाऱ्यांची चेन तोडू पाहत आहे, असा आरोप शिखरे यांनी केला आहे.