तोंडावरून चारचाकी गेल्याचा अंदाज
प्रतिनिधी / मिरज
शहरातील कोल्हापूर रोड, महात्मा फुले चौक येथे मंगळवारी सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला आहे. सदर व्यक्तीच्या चेहऱ्याचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून, रात्रीच्या सुमारास अज्ञात चारचाकीखाली सापडून सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मयत व्यक्तीच्या तोंडावरूनच वाहन गेल्याने ओळख पटविण्यात अडचणी येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवारी रात्रीपासून पाऊस पडत होता. त्यामुळे फुले चौकात रस्त्यावर पाणी तुंबून होते. सकाळच्या सुमारास रस्त्याच्या मध्यभागी राडीने माखलेला एक पुरुष रस्त्यावर पडल्याचे तेथील नागरिकांना दिसून आले. नागरिकांनी पाहिले असता सदर व्यक्तीच्या डोक्याचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. नागरिकांनी याबाबत महात्मा गांधी चौकी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाखाली सापडून सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, मयत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही.