एक वृद्धा जखमी, लोणी बाजारातील घटना
प्रतिनिधी / मिरज
शहरातील लोणी बाजार येथे भर बाजारात भल्यामोठ्या वडाच्या झाडाची फांदी अचानक तुटून पडल्याने नागरिकांची धावपळ उडाली. झाडाखाली भाजीपाला विकत बसलेली महिला किरकोळ जखमी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवत हानी झाली नाही. काही विद्युत तारा तुटल्या. महापालिका अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर फांदी रस्त्यातून बाजूला केली. रस्त्याच्या मध्यभागीच झाडाची फांदी कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
महापालिका कार्यालयापाठीमागील रस्त्यावर लोणी बाजार आहे. हा परिसर मोठमोठ्या झाडांनी बहरला आहे. या रस्त्याच्या एका बाजूस वडाचे महाकाय झाड आहे. या झाडाखाली दररोज मोठ्या संख्येने भाजीपाला विक्रेते भाजी विक्रीसाठी बसलेले असतात. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास वडाच्या झाडावरील एक फांदी अचानक तुटून खाली आली. विद्युत तारांमध्ये अडकून प्रारंभी आवाज आला. सुदैवाने झाडाखाली आज गर्दी नव्हती. एक वृद्ध महिला भाजीपाला विक्री करत बसली होती. सदर वृद्धेच्या डोळ्याला फिरकोळ दुखापत झाली आहे. भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाडी. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.