प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील शनिवार पेठ, बागवान गल्ली येथे राहणाऱ्या मुस्ताक महंमदहुसेन बागवान (वय 47) यांच्या बंद घराच्या गॅलरीतुन प्रवेश करून घरातील तिजोरी फोडून चोरट्यांनी नऊ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत बागवान यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
बागवान हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. गुरूवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या भिंतीवरुन गॅलरीत प्रवेश केला. त्यानंतर जिन्यावरुन उतरुन जावून दरवाजा उघडला. आतील लोखंडी कपाटाचा दरवाजा कशाने तरी उचकटून त्यांनी ऐवज चोरुन नेला.
त्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. बागवान हे सकाळी घरी आल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी आतजावून पाहणी केली असता, कपाटातील नऊ हजार रुपयांची रोख रक्कम, आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 70 हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी अज्ञात चोरटय़ांविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.