महापालिका आणि नगरसेवकांचा निषेध
प्रतिनिधी / मिरज
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात ड्रेनेजच्या सांडपाण्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांच्या विरोधात शनिवारी रास्तारोको आंदोलन केले. गेल्या महिनाभरापासून ड्रेनेजची गळती थांबत नसल्याने महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनात रेल्वे जंक्शन खोकी संघटना संयुक्त सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक रिक्षा संघटना, मिरज शहर सुधार समितीसह विविध संघटनांनी सहभाग घेतला. महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांना आंदोलकांनी घेराव घालून जाब विचारला. ड्रेनेजच्या पाण्याची गळती थांबली नाही तर, गटारीचे पाणी महापालिकेत आणून ओतू असा इशारा आंदोलकांनी दिला.
अख्खे शहर गटार गंगेत बुडाले असताना सत्ताधारी नगरसेवक आणि महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. शहरात ड्रेनेजच्या पाण्यामुळे साथीच्या आजाराचे थैमान सुरू झाल्यानंतर महापालिकेला जाग येणार का ? असा संतप्त सवाल यावेळी आंदोलकांनी विचारला. केवळ टक्केवारीसाठी प्रभागात विकास कामांचा आव आणणाऱ्या नगरसेवकांचा यावेळी धिक्कार करण्यात आला. या रास्तारोको आंदोलनामुळे रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड परिसरात वाहतूक ठप्प झाली होती.