व्यायाम करीत असताना तोल जाऊन पडल्याचा अंदाज
प्रतिनिधी / मिरज
घराच्या तिसऱ्या मजल्यावर व्यायाम करीत असताना तोल जाऊन पडल्याने चंद्रकांत शिवाजी चोरगे (वय ४६) या फर्निचर व्यावसायिकाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास शहरातील माधव टाकीजवळ लोणार गल्ली येथे ही घटना घडली. याबाबत मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
चंद्रकांत चोरगे हे चोरगे फर्निचर दुकानाचे मालक आहेत. लोणार गल्ली माधव टाकीजवळ त्यांचे तीन मजली घर आहे. पहिल्या मजल्यावर त्यांचे फर्निचरचे दुकान असून तिसऱ्या मजल्यावर ते नियमितपणे व्यायाम करीत असतात. शनिवारी सकाळीही ते व्यायाम करण्यासाठी गेले होते. यावेळी तिसऱ्या मजल्यावरील पाठीमागील गॅलरीतून त्यांचा तोल गेल्याने ते थेट जमिनीवर येऊन आदळले.
चोरगे हे तिसऱ्या मजल्यावरून पडल्याचे दिसताच त्यांचे नातेवाईक आणि आसपासच्या शेजाऱ्यांनी धावत येऊन जोरात आरडाओरड केली. मात्र तोवर चोरगे यांचा जागीच मृत्यू झाला होता. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहावर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. हिंदू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष परशुराम चोरगे यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ-बहीण असा परिवार आहे. तिसऱ्या मजल्यावरून पडून फर्निचर व्यवसायिकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.