प्रतिनिधी / मिरज
तुमच्या बँक खात्यावर पाच हजार रुपयांचा कॅशबॅक आला असून, फोन पेवर जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा, असे सांगून एका भामट्याने मिरजेतील भाजी विक्रेत्याला १० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. याबाबत महंमद इलियास रफिक बागवान (वय २४, रा. गुरुवार पेठ, सलाते मशिदीजवळ, मिरज) यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
बागवान हा सकाळी साडेदहा वाजता लक्ष्मी मार्केट चौकात भाजी बाजारात व्यापार करीत असताना त्याला फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने बागवान याला तुमच्या बँक खात्यावर पाच हजार रुपयांचा कॅशबॅक आला असून, फोन पे पेमेंट अप्लिकेशनवर जाऊन बेल आयकॉन सुरू करा, असे सांगितले. त्यानंतर बागवान याने तसे केले असताना बँक खात्यावरून दहा हजार रुपयांची रक्कम काढल्याचा एसएमएस आला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजताच बागवान यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे.