प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील मिरासाहेब दर्गा कब्रस्तानमध्ये मंगळवारी रात्री एका मनोरुग्ण तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अस्लम अमिन मुश्रीफ (वय 28, रा. गुरूवार पेठ, मुजावर गल्ली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद झाली आहे.
घटनास्थळावरुन तसेच मिरज शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, अस्लम मुश्रीफ हा मनोरुग्ण असून, त्याला गोळ्या सुरू होत्या. त्याच्या घराजवळून काही अंतरावरच मिरासाहेब दर्गा आहे. दर्ग्याच्या पाठीमागे कब्रस्तान आहे. अस्लम नेहमी मिरासाहेब दर्ग्यात येऊन नमाज पठण करीत असे. त्यानंतर दिवसभर कब्रस्तानमध्येच फिरत असे. कब्रस्तानमध्येच बसण्याचा त्याचा नित्यनेम असल्याने त्याचे कुटुंबिय व दर्ग्यातील लोक फारसे लक्ष देत नव्हते.
मंगळवारी दिवसभर अस्लम हा दर्गा आवार आणि कब्रस्तानमध्ये वावरत होता. रात्रीच्या सुमारास त्याने कब्रस्तानमधील चिंचेच्या झाडाला लायनॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास दर्ग्यातील लोक व काही भाविक कब्रस्तानमध्ये आले असता झाडाला पुरूष लटकत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी नागरिकांनी मोबाईल बॅटरी लावून पाहिले असता अस्लम मुश्रीफ याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नागरिकांनी अस्लम याच्या कुटुंबियांना व शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउढन पंचनामा केला. मिरासाहेब दर्ग्याच्या कब्रस्तानमध्ये मनोरुग्ण तरुणाने आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली.