नवीन बांधकाम नियमावलीमुळे शहरातील पार्किंग समस्या निकालात निघणार
संजय गायकवाड / सांगली
मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी लागू करण्यात आलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली अर्थातच युनिफाईड डीसीआरमुळे एका बाजूला महापालिका नगरपालिका क्षेत्रात वाढीव एफएसआयमुळे उंच इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच या नियमावलीमुळे `मेकॅनिकल’ आणि `पझल’ या पार्किंगमधील नव्या पार्किंगचा पर्याय पुढे आला आहे. सांगली, मिरजेत येत्या पाच ते दहा वर्षात उभ्या राहणाऱया सर्व उंच इमारतीमध्ये अशा प्रकारची `मेकॅनिकल’ पार्किंगची यंत्रणा असेल. यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त चारचाकी गाड्या पार्क करणे रहिवाशांना शक्य होणार आहे. यामुळे सांगली, मिरजेतील पार्किंगची समस्याही बऱयापैकी मार्गी लागणार आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांसाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू केली आहे. या नियमावलीमध्ये पुणे, नागपूर, नाशिक या तीन महापालिकांच्या ठिकाणी उंच इमारती उभारण्यावर निर्बंध असणार नाहीत. उर्वरित सांगली, मिरज, कुपवाडसह 23 महापालिका आणि 200 पेक्षा जास्त नगरपालिका व नगरपंचायतींना नव्या बांधकाम नियमावलींचा मोठा फायदा होणार आहे.
नवीन युनिफाईड डीसीआरमुळे सांगली मिरजेत 17 मजल्यापर्यंतच्या उंच इमारती उभ्या करता येणार असतानाच अशा इमारतीमध्ये राहणाऱया रहिवाशांना पार्किंगची समस्या जाणवू नये, यासाठी `मेकॅनिकल’ आणि `पझल’ पार्किंगचा नवा पर्याय मिळणार आहे. मेकॅनिकल पार्किंगमध्ये संबंधित इमारतीच्या तळमजल्यावर अगदी दोन मजले फक्त पार्किंगसाठी राखीव ठेवता येतील. यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त चारचाकी गाड्या पार्क करणे शक्य होणार आहे. मेकॅनिकल पार्किंगमध्ये सर्व यंत्रणा मशिनव्दारे नियंत्रण केली जाणार आहे. त्यामुळे एखाद्या फ्लॅटधारकाला गाडी पार्क करताना स्वतः जागा शोधत बसण्याची गरज भासणार नाही. ऍटोमेटीक मशिनव्दारे संबंधित गाडी उचलून जेथे जागा रिकामी असेल तेथे ती गाडी पार्क केली जाईल. ही सगळी प्रक्रिया अत्यंत कमी वेळेत होणार आहे. त्यामुळे इमारतीच्या खाली सध्या पार्किंगच्या जागेत कशाही गाडया उभ्या केल्या जातात. बऱयाचवेळेला बाहेरील लोक वाहने पार्क करतात. त्याचाही फ्लॅटधारकांना त्रास सहन करावा लागतो. मेकॅनिकल पार्किंगमध्ये या समस्या राहणार नाहीत.
पार्किंगची समस्या निकालात
सांगलीसारख्या शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. नवीन युनिफाईड डीसीआरमुळे येत्या पाच ते दहा वर्षात सांगली मिरजेसारख्या शहरात उंच इमारती उभ्या राहत असताना त्यामध्ये मेकॅनिकल आणि पझल पार्किंगचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त त्यातही एकावर एक अशा गाड्या पार्किंग करता येणार आहेत. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी सध्या फ्लॅटधारकांना रस्त्यावर गाडया उभ्या कराव्या लागतात. मेकॅनिकल पार्किंगमुळे ही समस्या मोठया प्रमाणात कमी होईल. रस्त्यावर चारचाकी गाड्या पार्किंग करण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा अन्य वाहनांना त्रास होणार नाही. सध्या बांधकाम क्षेत्रामध्ये नवीन इमारती बांधताना फ्लॅटधारकांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात आता मेकॅनिकल आणि पझल पार्किंगची भर पडणार आहे. शिवाय 24 तास सुरक्षा व्यवस्था, गार्डन, वॉकींग ट्रक, जिम आणि पाळणाघर आदी बाबीही मिळणार आहेत.
मेकॅनिकल पार्किंग नवीन संकल्पना
दरम्यान मेकॅनिकल, पझल आणि हायड्रोलिक पार्किंग या संकल्पना सांगली मिरजेत नवीन असल्या तरी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, नागपूर, नाशिक यासारख्या मोठया शहरात मेकॅनिकल पार्किंग यापूर्वीच सुरू झाले आहे. सांगली, मिरजेत नजिकच्या काळात उभ्या राहणाऱया सर्व उंच इमारतीमध्ये मेकॅनिकल पार्किंगची सुविधा फ्लॅटधारकांसाठी उपलब्ध असेल. अशी माहिती बांधकाम व्यावसायिक दीपक सूर्यवंशी व आर्किटेक्ट प्रमोद परीख यांनी दिली.