सांगली सिव्हिलमधील टँक दहा दिवसात सुरू होणार : जिल्हाधिकारी
प्रतिनिधी/सांगली
जिल्ह्यातील मिरज, पलूस व कवठेमहांकाळमध्ये लवकरच ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार बैठकीत दिली. त्याचबरोबर वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयांमध्ये उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन टँकचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दहा दिवसात ही यंत्रणा कार्यान्वित होईल. सिव्हिलमध्ये उभारण्यात येणारा टँकमध्ये ऑक्सिजन निर्मिती नसून तो साठवण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती देताना ते म्हणाले, पालकमंत्री जयंत पाटील यांनी सुचवल्याप्रमाणे ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट सुरू करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. कवठेमहांकाळ, पलूस व मिरज शासकीय रुग्णालय परिसरामध्ये ऑक्सिजन तयार करण्याचे प्लॅन्ट उभा करण्याची तयारी आहे. सध्या जिह्यामध्ये पस्तीस ते चाळीस मे. टन ऑक्सिजन लागतो. सध्या तुटवडा नसला तरी तो कमी पडणार नाही याची खबरदारी प्रशासन वेळोवेळी घेत आहे.
सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टँक उभारण्यासाठीचे मटेरियल वेळेत उपलब्ध न झाल्याने उभारणीस उशीर झाला आहे. मात्र सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून दहा दिवसात ही यंत्रणा कार्यान्वित होईल. हा टँक ऑक्सिजन साठवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यातून रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्याठिकाणी ऑक्सिजनची निर्मिती होणार नाही. सध्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन मिळत आहे. ही यंत्रणा अद्याप तयार नाही. त्याचा कोणताही परिणाम सद्यस्थितीत कोव्हिड उपचारांमध्ये होत नाहीत. त्यामुळे कोव्हिड रुग्णांची गैरसोय होत नाही. या शासकीय रुग्णालयातही इतर आजाराचे रुग्ण अधिक आहेत. त्यांना लागणारा ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात देण्यात येत आहे.
भाजी मंडई अन्यत्र हलवणार
विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये भाजीपाला होलसेल बाजार हलविल्यामुळे गर्दी होत असेल तर ती टाळण्यासाठी भाजीपाला बाजार अन्यत्र हलवण्याबाबत महापालिका आयुक्तांना सूचना देऊ, असे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. दरम्यान महापालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली देण्यात येणाऱया पासची खात्री करण्यात यावी. चुकीच्या लोकांना असे पास दिले जाऊ नयेत याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
ऑक्सिजन ऑडिट सुरु
नाशिक ऑक्सिजन गळती घटनेनंतर जिह्यात काय दक्षता घेतली जात आहे, याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, जिह्यातील खाजगी व सरकारी सर्वच रुग्णालयाच्या ऑक्सिजन पुरवठÎाचे ऑडिट करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. लवकरच ऑडिट पूर्ण होईल. दरम्यान जिह्यातील खाजगी व सरकारी रुग्णालयांमधील फायर ऑडिट पूर्ण झाले आहे. या ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आल्याचेही डॉ. चौधरी यांनी सांगितले.