नवरात्रोत्सव आणि ईद-ए-मिलाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची रंगीत तालिम
प्रतिनिधी / मिरज
नवरात्रोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सांगली-मिरजेतील पोलिसांनी दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक सादर केले. लक्ष्मी मार्केट येथे झालेल्या या प्रात्यक्षिक कार्यक्रमात 17 पोलिस अधिकाऱ्यांसह 150 हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. प्रारंभी शहरातील प्रमुख मार्गावरुन संचलन करण्यात आले.
सध्या कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे शासनाने सण उत्सव साजरे करण्यावर निर्बंध घातले आहे. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करुन नागरिकांनी सहकार्य केले आहे. तशाच पध्दतीने नवरात्रोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणही साजरा करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. सण, उत्सवांच्या काळात कोठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलिसांची तयारी केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मंगळवारी सायंकाळी मिरज पोलिस उपविभाग आणि सांगली पोलिस विभागातील 150 हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांनी संचलन केले. शहर पोलिस ठाण्यापासून प्रमुख चौकातून ही संचलन रॅली काढण्यात आली. महसूल विभाग, वैद्यकीय विभाग आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनीही या संचलनात भाग घेतला. लक्ष्मी मार्केटच्या मुख्य चौकात पोलिसांची रंगीत तालिम घेण्यात आली. सण-उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तसेच अचानक दंगल उसळल्यास पोलिसांनी काय भुमिका घ्यावी, सौम्य लाठीचार्ज कसा करावा, गर्दी कशी पांगवावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.