महात्मा गांधी चौकी पोलिसांची कारवाई, कर्नाटकातून आला गुटख्याचा ट्रक, दोघांना अटक
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील सांगली-मिरज रस्त्यावरुन गुटखा आणि सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारा ट्रक पकडून महात्मा गांधी चौकी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली. एम एच 10- सी आर -0124 हा आयशर ट्रक कर्नाटकातून महाराष्ट्रात लाखो रुपयांचा गुटखा घेऊन येत असल्याची माहिती महात्मा गांधी चौकी पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी सांगली – मिरज रस्त्यावर नाकाबंदी करुन हा ट्रक पकडला. ट्रकमध्ये झडती घेतली असता गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला असा 31 लाख, 58 हजार, 800 रुपयांचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी आयशर ट्रकसह 47 लाख, 58 हजार, 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रक चालक दाऊद इकबाल मुल्ला (वय 26 रा. मलाबाद ता. अथणी) आणि हसन अप्पासाहेब सनदी (वय 30, रा. जकारहट्टी ता. अथणी, जि. बेळगाव) या दोघांना अटक केली आहे. सदर गुटखा कर्नाटकातून पुणे येथे घेऊन जाणार असल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे गुटखा तस्करीचे महाराष्ट्र-कर्नाटक रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.