अधिष्ठातांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी / मिरज
कोविड साथीदरम्यान मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर सोडण्यात येणार नसल्याचे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. सुधीर नणंदकर यांनी स्पष्ट केले. सातारा व सिंधुदुर्ग येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या मेडिकल कौन्सिलतर्फे होणार्या पाहणीसाठी या डाॅक्टरांच्या तात्पुरत्या बदल्या असून कोणीही बदलीच्या ठिकाणी तात्काळ जाणार नसल्याचेही डाॅ. नणंदकर यांनी सांगितले.
सातारा व सिंधुदुर्ग येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ डॉक्टरांची प्रतिनियुक्तीवर बदलीचे वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले आहेत. मिरज सिव्हिलमधील वरिष्ठ व कोविड उपचारात महत्त्वाची भूमिका असलेल्या डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशास विरोध होत आहे. मिरज सिव्हिल कोविड रुग्णालयात सुमारे चारशे रुग्णांवर उपचार सुरु असून येथील डाॅक्टर हलविल्यास कोरोना रुग्णसेवेवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आहे. याबाबत अधिष्ठाता डाॅ. नणंदकर यांच्याशी संपर्क साधला असता कोरोना साथीच्या काळात कोणाही डाॅक्टरांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.