सुभाषनगर येथील घटना, पती, सासू, सासरा आणि नणंदेवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी / मिरज
आमच्या वंशाला दिवा पाहिजे होता, पण तुला मुलगी झाली. माहेरुन सोन्याचे दागिने आणि चारचाकी घेण्यासाठी पैसे घेऊन ये, असे म्हणून पती, सासू, सासरा आणि नणंदेने संगनमत करुन विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याची घटना तालुक्यातील सुभाषनगर येथे घडली आहे. याबाबत मयुरी सुमित कांबळे (वय 27) या विवाहितेने मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी दिलेली अधिक माहिती मालगांव रस्त्यावरील शिंदे हॉल येथे बरगाले फ्लॉट सावली निवासमध्ये राहणाऱ्या सुमित अरुण कांबळे याच्याशी मयुरीचा हिचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. तिला एक मुलगीही झाली आहे. पण पती सुमित, सासू सुप्रिया अरुण कांबळे, सासरा अरुण भिमराव कांबळे आणि नणंद स्नेहाली सुभाष साबळे (रा. गुलाबराज पार्क, बौध्द मंदिराजवळ जुनी सांगवी, पिंपरी-चिंचवड पुणे) हे चौघेजण वारंवार जाच करीत होते.
आमच्या वंशाला दिवा पाहिजे होता. पण तू मुलीला जन्म दिलास. आता माहेरी जावून सोन्याचे दागिने घेऊन ये. चारचाकी घेण्यासाठी पैसे घेऊन ये, असे म्हणून शारीरीक व मानसिक छळ केला जात होता. या जाचाला कंटाळून मयुरी कांबळे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात धाव घेऊन सासरच्या लोकांविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पती सुमित कांबळे, सासू सुप्रिया कांबळे, सासरा अरुण कांबळे आणि नणंद स्नेहाली साबळे या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.