सरासरी दर आठ ते दहा हजार : आतापर्यंत पाच लाखांवर पोत्यांची आवक
प्रतिनिधी / सांगली
हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या वसंतदादा पाटील मार्केट यार्डात दररोज तब्बल ३० हजार पोती हळदीची आवक होऊन सौद्यात विक्री होत आहे. गेल्या महिन्याभरापासून आवक सुरू झाली असून आतापर्यंत सुमारे पाच लाख पोत्यांची आवक झाली असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.
हळदीसाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. येथील हळदीला जगभरातून मागणी आहे. हळद उत्पादनासह उच्च दर्जाची हळद पावडर येथे तयार होते. अनेक हळद मिल असून लाखो क्विंटल हळदीची वर्षाला आवक-जावक होते. विशेष करुन आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक आदी ठिकाणीहून मोठ्या प्रमाणात हळद येथे विक्रीला येते. येथील मार्केट यार्ड आवारात रोज हळदीचे सौदे काढले जातात. हळदीला चांगला दर मिळत असल्याने तसेच शेतकऱ्यांनाही विश्वासाने व्यापाऱ्यांकडून पैसे मिळत असल्याने हळद व्यापार आणखीनच वाढताना दिसत आहे.
यंदाचा हळद हंगाम सुरु होवून महिना झाले असून सध्या मोठ्या प्रमाणात यार्डात हळद विक्रीला येत आहे. हळदीची पेठ हळदीच्या पोत्यांनी फुल्ल झाली आहे. हळदीची आवक वाढत असल्याने बाजार समिती प्रशासनानेही रविवार वगळता आठवडाभर सौदे काढण्यास सुरुवात केली आहे. दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी दोन टप्प्यात सौदे निघत आहेत. या सौद्यात तब्बल रोज ३० हजारावर पोत्यांची आवक होऊन विक्री होत आहे. आतापर्यंत महिन्याभरात तब्बल पाच लाख हळद पोत्यांची आवक झाली आहे. यामध्ये राजापुरी ४ लाख २६ हजार तर परपेठ ६६ हजार पोत्यांची आवक झाली असल्याचे सांगण्यात आले. राजापूरी, कडपा, सेलम आणि परपेठ हळदीची आवक मोठी आहे. हा हंगाम आणखी किमान मे मध्यावधीपर्यंत सुरू राहण्याची शक्यता असून या हंगामात किमान २० लाख पोत्यांवर हळदीची आवक होण्याची शक्यता व्यापाऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, यार्डात सुरू असलेल्या हळद सौद्याबाबत बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील व सचिव महेश चव्हाण म्हणाले, हळदीसाठी सांगलीची पेठ महत्वाची आणि प्रसिद्ध आहे, यामुळेच यार्डातील सौद्यात वर्षाला लाखो पोत्यांची हळदीची आवक होते. यंदाच्या हंगामाही मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होत आहे. दरही आठ हजारापासून ३० हजारापर्यंत मिळत आहेत. शेतकऱ्यांनी यार्डातील सौद्यात जास्तीत जास्त हळद विक्रीला आणावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.