कुपवाड / प्रतिनिधी
माधवनगर लगतच्या संजय इंडस्ट्रीज भागात एका विलगीकरण कक्षात जावून शासकीय अधिकाऱ्यांना उद्धट बोलून दमदाटी करणाऱ्या सांगलीतील एका ‘यू ट्यूब’ चॅनेलच्या पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
संशयित अतिश आवळे (जागर यु ट्युब चॅनल प्रतिनिधी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याने अधिकाऱ्यांना ‘तुम्हाला मस्ती आली आहे, तुम्ही राजकारण करता, तुमची बातमी लावून सगळ्यांना दाखवितो’, असे धमकावल्या प्रकरणी त्याच्याविरोधात ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली आहे. रात्रि उशिरापर्यंत संशयित अतिशला अटक करण्यात आली न्हवती. अतिश पसार असुन अटकेसाठी त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधवनगरलगत संजय इंडस्ट्रियल इस्टेट औद्योगिक वसाहत आहे. येथील एका कंपनीत कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे. या कक्षात ग्रामविकास अधिकारी उमेश कृष्णा नवाळे व आपत्ती व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शासकीय काम करीत होते. संशयित अतिश आवळे हा मंगळवारी दुपारी त्या विलगीकरण कक्षात गेला. त्याने नवाळेसह पदाधिकाऱ्यांना ‘तुम्हाला मस्ती आली आहे.
तुम्ही राजकारण करता’,असे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरडा करून सर्वांना दमदाटी केली.’ तुमची बातमी लावून सगळ्यांना दाखवितो’. असे म्हणून अतिश याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अतिश आवळे विरोधात कुपवाड पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आवळे विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.