प्रतिनिधी / कडेगाव
आजच्या धावत्या युगात इंग्रजी शाळांकडे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा असला तरी मराठी माध्यमाच्या शाळादेखील या स्पर्धेत मागे राहिलेल्या नाहीत. हिंगणगाव बुद्रुक येथील नेहरू विद्यालयाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या शाळेचे मुख्याध्यापक मा. पवार पी. टी व शिक्षकांनी पुढाकार घेऊन या विद्यालयाला आय. एस. ओ. मानांकन मिळवून दिले आहे. त्याकामी कडेगाव तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी अनिस नायकवडी साहेब , शिक्षण विस्तार अधिकारी विकास राजेसाहेब व तोंडोली केंद्राचे केंद्रप्रमुख महापुरे साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले.
आय. एस. ओ. मानांकनासाठी विद्यालयातील स्कूलकमिटी सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, उद्योजक, व्यावसायिक यांच्या आर्थिक योगदानातून शाळेत अधिक भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले. यामध्ये स्वच्छ शालेय परिसर, वाहन तळ, सर्व वर्गात लेक्चर टेबल, अद्ययावत संगणक कक्ष, वाचन कक्ष,बोलक्या भिंती, अद्ययावत स्टेज व्यवस्था, विद्यार्थ्यांना मोफत वाय-फाय व्यवस्था, प्रत्येक वर्गामध्ये वाचनाची गोडी वाढण्यासाठी वाचन पेटी, सुसज्ज प्रयोगशाळा,अद्ययावत शिक्षक कक्ष, संपूर्ण परिसर सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्याच्या कक्षेत, मुलींचे झांज पथक, विविध खेळ खेळण्याची सुविधा,दुरदर्शनवरील कार्यक्रम पाहण्यासाठी स्मार्ट टीव्हीची सोय, मुख्य इमारतीसमोर प्रशस्त लाॅन इत्यादी सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय विद्यालयाच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक प्रयत्नशील आहेत.