सांगलीत बेड आणि ऑक्सिजन अभावी कोरोना बाधित वृद्धेचा गाडीतच मृत्यू…
मिरज / प्रतिनिधी :
88 वर्षीय आजी, तिला किरकोळ ताप होता. कोरोनाच्या संशयावरून तिला तपासणीसाठी सांगलीतील आदीसागर कोविड सेंटरमध्ये दाखल केले. दुर्दैवाने तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पण रुग्णालयात बेड शिल्लक नव्हते. रात्रभर संपूर्ण सांगली-मिरज फिरूनही बेड ऑक्सिजन मिळाले नाही. त्यामुळे गाडीतच आजीने प्राण सोडले.... आई-वडील नसल्याने आयुष्याचा आधार असलेली आजी झोपेतच मृत झाल्याने नातवाचे काळीज फाटले. नातवाने कुचकामी ठरलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे आजीला मुकलो असल्याची शोकभावना सोशल मीडियावर व्यक्त केल्यानंतर समाजातील सर्व स्तरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. बेडअभावी वृद्धेचा मृत्यू झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सदर रुग्णालयांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
सांगली जिल्ह्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहेत. आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. बेड आणि ऑक्सिजन अभावी अनेकांचा बळी जात आहे. विशेष कोवोड सेंटर सुरू करूनही रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. यापूर्वीही वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा बळी गेला आहे. बेडगेतील या वृद्धेचीही अशीच फरफट झाली.
मंगळवारी रात्री तालुक्यातील बेडग येथील एका 88 वर्षीय आजीची प्रकृती अचानक ढासळली. तिच्यात कोरोनाची लक्षणे होती. त्यामुळे नातवाने मोटारीमध्ये घालून आजीला सांगलीतील आदीसागर कोविड सेंटरमध्ये कोरोना चाचणीसाठी आणले. दुर्दैवाने तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने ऑक्सिजन आणि बेड असलेल्या रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नातवाची धडपड सुरू होती. मात्र एकही रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेतले नाही. रात्रभर भटकंती करून आणि तासन तास रुग्णालयाचे दरवाजे ठोठाऊनही एकही रुग्णालयात बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे बेडच्या शोधात असलेली आजीबाई अत्यवस्थ अवस्थेत गाडीत झोपली आणि झोपेतच तिला मृत्यने गाठले. उपचाराविना आजीचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातवाने सोशल मीडियावर याबाबतची हकीकत सांगितली. आजीला वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित तीचे प्राण वाचले असते. सोशल मीडियावर अनेकांनी आरोग्य यंत्रणेवर संतप्त भावना व्यक्त केल्या. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी या हॉस्पिटलची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.