प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारपासून सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्ड आणि गणपती पेठ होलसेल व्यापाऱ्यांच्यासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि खरेदीसाठी दोन्ही पेठांमध्ये एकच गर्दी उसळली.
वास्तविक गणपती पेठ आणि मार्केट यार्ड होलसेल खरेदीची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही निर्बंध शिथिल करताना दोन्ही पेठा मध्ये केवळ होलसेल व्यापाऱ्यांनाच मुभा असेल असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र मार्केट यार्ड आणि गणपती पेठ या दोन्ही ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी सात ते अकरा या वेळेत दोन्ही ठिकाणी लोकांची गर्दी उसळली होती. अकरा वाजल्यानंतरही गर्दीमुळे वाहने बाहेर काढताना वादावादी सुरू होती.