प्रतिनिधी / विटा
विट्यात विहिरीत पोहायला गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. चैतन्य सचिन वायदंडे (रा. हजारेमळा, विटा) असे मयत मुलाचे नाव आहे. ही घटना गुरूवार २५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. ए. डी. पाटील यांनी वर्दी दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, हजारे मळा येथील दहा वर्षीय चैतन्य वायदंडे यास पोहायला येत नव्हते. तो वडिलांकडे पोहायला शिकवण्याचा आग्रह करीत होता. चैतन्यचे वडिल यंत्रमाग कामगार आहेत. दिवसपाळी सुरू असल्याने रात्रपाळी सुरू झाल्यावर पोहायला शिकवतो, असे त्यांनी चैतन्यला सांगितले होते. मात्र गुरूवार २५ मार्च रोजी चैतन्य वडिलांच्या परस्पर घराशेजारी असणाऱ्या विहिरीत पोहायला गेला होता. मात्र पोहायला येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.