स्थळ बदलून पोलिसांना चकवा : आमदार गोपीचंद पडळकरांचा गनिमी कावा
पडळकरांसह 50 जणांवर गुन्हा : अनेक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा
प्रतिनिधी / आटपाडी
सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या बैलगाडी शर्यतीला रोखण्यासाठी तैनात प्रचंड पोलीस फौजफाट्याला चकवा देत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने नियोजित जागा बदलून वाक्षेवाडी (ता. आटपाडी) गावच्या हद्दीत पहाटे सहाच्या सुमारास हजारो समर्थक, शेतकऱ्यांच्या साक्षीने बैलगाडी शर्यत घेण्यात आली. पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या ४१ कार्यकर्ते व अनोळखी आठ ते दहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
झरे (ता. आटपाडी) येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने हाय व्होल्टेज संघर्ष उफाळला होता. न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला बंदी घातली आहे. त्यातच आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करून प्रशासनाला आव्हान दिले. प्रशासनाने झरेसह ९ गावात संचारबंदी लागू केली. जागोजागी नाकाबंदी करून प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात केला. शर्यतीच्या मैदानावर चर खुदाई करून अडथळे निर्माण करण्यात आले.
प्रशासनाने शर्यत रोखणार असल्याचे स्पष्ट केले. तर आमदार पडळकरांनी शर्यत होणारच असा निर्धार केला. त्यामुळे शुक्रवारी तणाव होता. आमदार पडळकर व समर्थकांनी नियोजित मैदानाऐवजी वाक्षेवाडीच्या हद्दीत तयार केलेल्या मैदानात शर्यत पार पाडण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी पहाटे पाच वाजल्यापासून शेतकरी, समर्थक कार्यकर्ते, बैलगाड्यांसह वाक्षेवाडीच्या माळरानावर हजर झाले.
आक्रमक जमावामुळे पोलीस शांत
आमदार गोपीचंद पडळकर हे समर्थकांसह वाक्षेवाडीतील मैदानावर दाखल झाले. हजारो समर्थकांच्या साक्षीने बैलगाडी शर्यत पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार पडळकर यांना खांद्यावर घेत जल्लोष केला. प्रशासनाने सर्वत्र नाकाबंदी केलेली असताना हजारो कार्यकर्ते शर्यतस्थळावर पोहचले होते. तर शर्यतीच्या ठिकाणाची माहिती मिळताच पोलीसांचा फौजफाटा देखील तेथे पोहचला. परंतु जमाव आक्रमक बनल्याने पोलीस स्तब्ध राहिले.
शर्यतीसाठी संघर्ष करु
आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना झरे येथील बैलगाडी शर्यत पोलीस प्रशासनाचे आवाहन, बंदोबस्तामुळे झाले नसल्याचे सांगितले. परंतु वाक्षेवाडीत शेतकऱ्यांनी बैलगाडी शर्यत आयोजित केल्याचे कळाल्याने आम्ही येथे दाखल झालो आहोत, असे सांगत येणाऱया कालावधीत बैलगाडी शर्यतीसाठीचा संघर्ष एकजुटीने करूया, असे आवाहन केले.
पडळकरांचा गनिमी कावा
दिघंची, नेलकरंजी, घरनिकी, तरसवाडीसह जिल्हा हद्दीवर पोलिसांनी प्रचंड फौजफाटा तैनात केला होता. झरे गावात सहजरित्या लोकांना प्रवेश करता येत नव्हता. पोलीस प्रशासनाला गाफील ठेवण्यात आमदार गोपीचंद पडळकर हे यशस्वी झाले. आणि शुक्रवारी दावा केल्याप्रमाणे गनिमी कावा करत बैलगाडी शर्यत यशस्वी करून दाखविली. त्यानंतर समर्थकांनी मोठा जल्लोष करत वाक्षेवाडीच्या शर्यत स्थळापासून आमदार पडळकर यांच्या विश्रामगृहापर्यंत जल्लोष केला.
शर्यती झाल्याने समर्थकांचा जल्लोष
आमदार पडळकर यांनी आयोजित केलेल्या शर्यतीला रोखण्यासाठी मोठे प्रयत्न होवुनही ते अयशस्वी ठरल्याने समर्थकांनी आनंदोत्सवासह त्यांचा गौरव केला. मैदानाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश लांडे आदिंनी आमदार पडळकर यांची भेट घेत शेतकऱयांच्या तीव्र मागणीला पाठींबा दर्शवत मैदानाबद्दल कौतुक केले. आमदार गोपीचंद पडळकर, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह आमदार पडळकर समर्थकांनी दोन दिवस मेहनत घेत बैलगाडी शर्यतीबाबतचा शब्द खरा केला.
- घटनाक्रम
- वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह प्रचंड फौजफाटा
- जागोजागी नाकाबंदी,
- झरेसह ९ गावात संचारबंदी
- कोर्टासह कोविड निर्बंध
- शर्यत स्थळावर चर खुदाई
- मध्यरात्री गोपनियरित्या मैदाने तयार
- वाक्षेवाडीतील मैदानावर शिक्कामोर्तब
- हजारोंच्या उपस्थितीत शर्यत संपन्न
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग प्रकरणी गुन्हा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचा भंग करून बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले तसेच लाखोंची बक्षीस जाहीर करत सोशल मिडीयाद्वारे याची प्रसिद्धी केली. तसेच वाक्षेवाडी येथे बैलगाड्या पळवून न्यायालयाचा अवमान केला आहे. यामुळे आमदार पडळकर यांच्यासह त्यांच्या 41 कार्यकर्ते व आठ ते दहा अनोळखी लोकांच्या विरोधात आटपाडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. |