प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरातील गजबजलेल्या रॉकेल लाईन वखारभाग परिसरात बिबट्या शिरला असल्याच्या चर्चेने जोरदार खळबळ माजली आहे. बुधवारी सकाळी सकाळीच या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वखार बाग परिसरात बिबट्या आल्याची वार्ता समजताच शहर पोलीस आणि महापालिका अग्निशमन विभाग त्यांनी तातडीने धाव घेऊन राजवाडा चौक, पटेल चौक, वखारभाग, रॉकेल लाईन हा परिसर सील केला आहे. या बिबट्याने एका कुत्र्याला ठार केले आहे. अग्निशमन विभाग पोलिस वन विभाग व महापालिका यांनी त्याच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे.
वखार भाग परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. बायपास रोड कृष्णा नदी परिसर या भागातून या बिबट्याने सांगली शहरात प्रवेश केला असावा अशी चर्चा आहे. दरम्यान हा नेमका बिबट्याच आहे का अन्य कोणता प्राणी आहे याबाबत पोलिस अथवा महापालिका यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सांगली शहरांमध्ये पहाटे फिरावयास जाणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तथापि बिबट्याला पाहिल्याचे कोणाकडून सांगण्यात आले नाही. पण बिबट्याच्या चर्चेने मात्र सांगली शहरात खळबळ उडाली आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत ही मोहीम सुरूच होती.