60 प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची चोरी, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा
प्रतिनिधी / मिरज
शहरातील शासकीय तंत्रनिकेतमधील प्रयोगशाळा फोडून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख, 58 हजार, 150 रुपयांचे विविध साहित्य चोरुन नेले आहेत. 16 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत ही चोरी झाली आहे. याबाबत प्रयोगशाळा सहाय्यक अशोक नामदेव पुकळे (वय 44, रा. व्यंकटेश अपार्टमेंट, सह्याद्री फ्लॉट नं. 106, सह्याद्रीनगर, मिरज) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
चोरीस गेलेल्या साहित्यांमध्ये विविध प्रकारचे व्हॉल्व, ऍक्टीव्ह सिलेंडर, फलो कंट्रोल, डायरेक्टर ऑपरेटर प्रेशर कंट्रोल, सिक्विन्स, प्रेशर कंपेरसेटेड फलो कंट्रोल, हायड्रोलिक सिलेंडर, रॅडीयन पिस्टल पंप, अक्युमिटर स्वीच, न्युमॅटिक सर्किट, पायलट ऑपरेटर आदी 60 हून अधिक उपकरणांचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या या उपकरणांची किंमत एक लाख, 58 हजार, 150 रुपये असल्याचे अशोक पुकळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालयात खोली नं. 53 मध्ये प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळा विविध संशोधनासाठी लाखो रुपयांचे अत्याधुनिक उपकरणे ठेवण्यात आली आहेत. 16 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी प्रयोग शाळेच्या खिडकीचे लोखंडी गज कशाने तरी कापून आत प्रवेश केला. त्यानंतर प्रयोगशाळेतील वरील साहित्य चोरुन नेले. प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना ही चोरीची बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठांच्या सुचनेनुसार महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. दरम्यान, शहर आणि परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरटे आता शासकीय कार्यालये फोडून चोऱ्या करीत आहेत. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.