प्रतिनिधी/जत
महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्त योजना राबवली. यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला. असे असताना जत तालुक्यातील जिल्हा बँकेच्या मार्केट यार्ड शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या सोसायटीत बोगस कर्जमुक्तीचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. याबाबत शेकव्वा रायपा संती (रा.मेंढेगिरी) व मूर्ग्यापा गुरुबसू हिप्पर्गी (रा.रावळगुंडवाडी) या शेतकऱ्यांनी ८३०९ रुपयांचा गैर लाभ घेतल्याप्रकरणी व त्यांना मदत करणारे बँकेचे अधिकारी गुरुबसू इरापा दुंडी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ (सांगली) शिवाजी सोनार यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे.यामुळे बोगस कर्जमुक्तीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.