गुरव हे एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्र पोलीस दलातील पहिले अधिकारी
प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील पडवळवाडीचे सुपुत्र, मुबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी अखेर एव्हरेस्ट शिखर सर केले. आयपीएस सुहेल शर्मा, औरंगाबाद येथील पोलीस कर्मचारी रफिक शेख यांच्यानंतर पोलीस दलातील गुरव यांनी एव्हरेस्ट सर केला आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील एव्हरेस्ट सर करणारे गुरव हे पहिले अधिकारी आहेत.
संभाजी गुरव हे पडवळवाडी या छोट्याशा गावातील. गुरव यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते पोलीस दलात गेले. त्यांनी व्यायाम आणि शारीरिक क्षमता राखण्यावर भर ठेवला. त्यामुळेच त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर सर करण्यात यश मिळवले. एव्हरेस्ट शिखराची चढाई ८८४८ मीटरची आहे.अनंत अडचणी, बर्फवृष्टी या संकटावर मात करुन गुरव यांनी एव्हरेस्टवर पाय रोवले.
महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या अधिकाऱ्याने हे शिखर पार केले आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून कष्ट घेतले. अहोरात्र तयारी केली. त्यामुळेच हे यश मिळाले असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. तर एव्हरेस्टवीर गुरव म्हणाले, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.