प्रतिनिधी/सांगली
बुधवारी जिल्हय़ात कोरोनाचे 212 रूग्ण वाढले आहेत. तर 91 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सहा जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामध्ये सांगली शहरातील दोन, आष्टा, मिरज, कुपवाड आणि बोरगाव (कवठेमहांकाळ) येथील प्रत्येकी एक रूग्ण दगावला आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या 113 झाली आहे.
सांगली-मिरज महापालिका क्षेत्रात 144 रूग्ण वाढले
सांगली महापालिका क्षेत्रात बुधवारी 144 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क व्यक्तीचा समावेश आहे. शहरातील हनुमाननगर, विश्रामबाग, गावभाग, खणभाग, गणेशनगर या भागातील कोरोना रूग्ण मोठयाप्रमाणात आहेत. तर मिरज शहरातील विविध उपनगरातील रूग्ण आहेत. महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेली ऍण्टीजन टेस्टमुळे मोठय़ाप्रमाणात रूग्णही वाढत चालले आहेत. ज्यांना सौम्य लक्षणे आहेत त्यांना मात्र महापालिकेकडून घरीच उपचार सुरू केले आहेत. त्यांच्या प्रकृतीची तपासणी आरोग्य अधिकाऱयांच्यामार्फत केली जाते त्यानंतर त्यांना कशा प्रकारे काळजी घ्याव्याची याची माहिती दिली जाते. त्यामुळे रूग्णालयात लक्षणे नसणाऱया रूग्णांना पाठविलेच जात नाही. पण ज्याची प्रकृती नाजूक आहे तसेच ज्यांना इतर आजार आहेत त्यांना मात्र दवाखान्यात दाखल केले जात आहे. सांगली शहरात नवीन 88 रूग्ण वाढले तर मिरज शहरात 56 रूग्ण वाढले आहेत.
ग्रामीण भागात 68 नवीन रूग्ण वाढले आहेत
जिल्हय़ात नवीन 212 रूग्णांपैकी 68 रूग्ण हे ग्रामीण भागात वाढले आहेत. त्यामध्ये जत तालुक्यात एक, खानापूर तालुक्यातील वेजेगाव येथे पाच, फुलेनगर विटा येथे तीन, गार्डी येथे एक असे नऊ रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यातील कुमठे येथे सात तर इतर ठिकाणी दोन रूग्ण वाढले आहेत. मिरज तालुक्यात एकूण 13 रूग्ण वाढले आहेत. हे रूग्ण दुधगाव, भोसे, मालगाव, अंकली, कसबेडिग्रज येथे वाढले आहेत. शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे दोन, बिळाशी येथे दोन, शिराळा शहरात तीन असे सात रूग्ण वाढले आहेत. वाळवा तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात एकूण 25 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये कुकटोळी येथे 21 रूग्ण वाढले आहेत. बोरगाव येथे एक, धुळगाव येथे एक आणि झुरेवाडी येथे एक रूग्ण वाढला आहे.
सहा जणांचे उपचारादरम्यान मृत्यू
जिल्हय़ात बुधवारी उपचार सुरू असताना सहा जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये सांगली शहरातील 46 वर्षीय महिला आणि हनुमाननगर येथील 55 वर्षीय महिला यांचा मिरजेतील कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यातील आष्टा येथील 80 वर्षीय व्यक्तीचा तर मिरज शहरातील 62 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान वानलेस हॉस्पिटल मिरज येथे मृत्यू झाला. कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील 90 वर्षीय व्यक्तीचा वानलेस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर कुपवाड येथील 55 वर्षीय महिलेचा सिव्हील हॉस्पिटल येथे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात आतापर्यंत कोरोनाने 113 जणांचे बळी गेले आहेत.
जिल्हा परिषदेत तिघांना कोरोना
जिल्हा परिषदेमधील वरिष्ठ अधिकाऱयांचे वाहनचालकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हापरिषदेमध्ये खळबळ माजली आहे. त्याबरोबरच अर्थ विभागातील एक कर्मचारी आणि कृषि विभागातील एक कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जिल्हापरिषदेमध्ये आतापर्यंत 43 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
91 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात जरी कोरोनाचे रूग्ण मोठय़ासंख्येने वाढत असले तरीसुध्दा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. बुधवारी 91 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण त्यांना आणखीन 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 3750
बरे झालेले 1579
उपचारात 2058
मयत 113