व्यापाऱ्यावर गुन्हा, पोलिस नसल्याचे पाहून सकाळी सात वाजताच उघडले दुकान
ऑनलाईन टीम / मिरज
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरू असताना शहरातील मंगळवार पेठ, शनी मारुती मंदिराजवळ एका तळ घरात किराणा दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी महेश त्रिचंद्र सिंधी (वय 23) या व्यापाऱ्यावर शहर पोलिसात188 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सकाळी चौकात पोलिस बंदोबस्त नसल्याचा गैरफायदा घेत व्यापार करुन गल्ला जमविण्याचा या व्यापाऱ्याचा मनसुबा होता. मात्र, पोलिसांच्या कारवाईनंतर तो उधळला.
सध्या कोरोना संसर्गजन्य आजाराने शहरात अक्षरश थैमान घातले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 23 ते 30 जुलै या कालावधीसाठी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. दूध, मेडीकल व अन्य अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यापार, बाजार पेठा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. किराणा भुसारी दुकानेही बंद ठेवण्यास सांगितले आहेत.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मंगळवार पेठेतील महेश त्रिचंद्र सिंधी हा किराणा व्यापारी दररोज सकाळी आपले तळघरातील दुकान सुरू करुन व्यवसाय करीत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी पोलिसांना केली होती. मंगळवारी सकाळी सात वाजता रस्त्यावर पोलिस बंदोबस्त नसल्याचे पाहून या व्यापाऱ्याने पुन्हा दुकान उघडले. बघता बघता दुकानामध्ये ग्राहकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी सदर दुकानदाराला ताब्यात घेऊन त्याच्यावर भारतीय दंड संहिता अधिनियम 188 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही दुकाने उघडल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.