जबरदस्तीने पंधराशे रुपये काढून घेतले : दोन आरोपींचा समावेश : एकास अटक
प्रतिनिधी / इस्लामपूर
येथील बेघर वसाहतीमधील एक गुंड व त्याच्या साथीदाराने खाजगी सावकारीतून एकाच्या खिशातून जबरदस्तीने पंधराशे रुपयांची लूट करुन कुऱ्हाडीने खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. हा प्रकार शुक्रवारी भरदुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. यातील मुख्य सुत्रधार रोहित उर्फ बारक्या पंडीत पवार (रा. बेघर वसाहत, जयगड अपार्टमेंट) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर या गुन्ह्यात आणखी एका साथीदाराचा समावेश आहे.
आदित्य आप्पासाहेब कांबळे (19, रा.राजगड, अपार्टमेंट) याला सावकारकीच्या वसुलीतून त्रास देवून त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. पवारचा साथीदार पंकज मुळीक याचाही यात समावेश आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये कांबळेने रोहितकडून 10 हजार रुपये घेतले होते. दरम्यान पवारने सध्या रोहितकडे असलेली त्याच्या स्प्लेंडर मोटारसायकल ठेवून घेतली होती. पवार अधूनमधून येवून त्याच्याकडून रक्कम घेवून जात होता. त्यातून त्याचे पूर्ण 10 हजार रुपये देवून मोटारसायकल परत घेतली होती.
शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आदित्य व त्याचा भाऊ आयुष, मामेभाऊ राम गणेश पवार अपार्टमेंटसमोर उभे होते. त्यावेळी रोहित व मुळीकने त्याना शिवीगाळ करीत चार हजार रुपये व्याजाची मागणी केली. अपार्टमेंटमधील लोकांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून हाकलून लावले. आदित्यचे भाऊ भितीने निघून गेले. मुळीकने कांबळेला पकडून खिशातील पंधराशे रुपये काढून घेतले. पवार कुऱ्हाड घेवून ठार मारण्याच्या उद्देशाने अंगावर धावून आला. वार चुकवून कांबळेने पळ काढला. शनिवारी याप्रकरणी त्याने इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली.