सावळज / वार्ताहर
सावळज ता.तासगाव येथील आदित्य विशाल भोरे (वय १७) या कॉलेज युवकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावरील कट्ट्यावर रविवारी सकाळी या युवकाचा मृतदेह आढळून आला. मात्र आत्महत्याचे कारण समजले नाही.
तो अकरावीच्या विज्ञान शाखेत शिकत होता. मात्र काल रात्री पासून घरातुन बेपत्ता होता. घरचे लोक रात्रभर शोध घेत होते. मात्र रविवारी सकाळी विद्यालयाच्या पटांगणात मृत अवस्थेत युवक आढळून आला. गरीब कुटुंबातील कॉलेज युवकाचा मृत्यु झाल्याने सावळजमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीसांकडुन व घटनास्थळांवरून मिळालेली माहिती अशी, मृत आदित्यचे चुलते लखन भोरे यांनी तासगाव पोलिस स्टेशनला आकस्मिक निधन झाल्याची वर्दी दिली. मात्र शवविच्छेदन अहवालानुसार विषारी औषधांमुळे युवकाचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी गोसावी यांनी सांगितले आहे. विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटनास्थळी चर्चा असून आत्महत्यामागले कारण समजू शकले नाही. सदर घटनेचा तपास पोलिस नाईक बि.बि.थोरात हे करत आहे.