कोल्हापूरच्या टॅक्सी चालकाचा व्हिडिओ व्हायरल, मिरजेत येताच पोलिस आर्थिक दंड करीत असल्याची तक्रार
प्रतिनिधी / मिरज
साहेब, कोरोनाने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. आता कुठे आम्ही सावरतोय. त्यातच फायनान्स कंपन्यांही हफ्ता भरण्यासाठी तगादा लावत आहेत. एकीकडे पेट्रोल-डिझेल दराचा भडका उडालाय. दोन-चार पैसे मिळावेत, म्हणून आम्ही भाडेकरुंना घेऊन येतोय. मात्र, मिरज शहरात प्रवेश करताच तुमचे वाहतूक पोलिस आर्थिक दंड करतात. राबून खाणाऱ्या टॅक्सी चालकांची अशी लुटमार बरी नव्ही. तुम्हीच आता ही लुट थांबवा, अशी मागणी कोल्हापूरच्या एका टॅक्सी चालकाने व्हीडीओच्या माध्यमातून केली आहे. या टॅक्सी चालकाची व्हीडीओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून, मिरज शहर वाहतूक पोलिसांच्या लुटमारी विरोधात नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
कोरोनाच्या नावावरच पोलिसांकडून आर्थिक लुट सुरू असल्याची तक्रार नागरिकांतून होत आहे. गाडीची सर्व कागदपत्रे दाखविली असताना तसेच कोरोना नियमांचे पालन केले असतानाही पोलिस आर्थिक दंड करीत असल्याची तक्रार आहे.
मिरज शहर वाहतूक पोलिसांच्या अशाच लुटमारीला बळी पडलेल्या कोल्हापूर येथील अजित पाटील या टॅक्सी चालकाने व्हीडीओच्या माध्यमातून हकीकत मांडली आहे. सदर टॅक्सी चालक या व्होडिओ म्हणतोय, नमस्कार मी अजित पाटील. टॅक्सी चालक आहे. कोल्हापुरातून बोलतोय. मिरजेतील वाहतूक पोलिस वेगवेगळे कारण सागून पैसे मागत आहेत. प्रत्येक ट्रीपला दोनशे ते हजार रुपयांपर्यंत विनाकारण दंड भरावा लागतो. पोलिसांना दररोज दंड दिला, तर परमिटच्या गाड्या चालवून तसेच शासनाचा नियमित कर भरुन काय फायदा? असा केविलवाणा सवालही या टॅक्सी चालकाने या व्हीडीओच्या माध्यमातून केला आहे.