प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील सुभाषनगर येथे चोरट्यांनी बंद घर फोडून आतील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा तीन लाखांचा ऐवज लंपास केला. याबाबत खुदबुद्दीन जैनुद्दीन उमराणी (वय ५०) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी ठसेतज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण केले आहे. भरवस्तीत ही घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये घबराट आहे.
खुदबुद्दीन उमराणी यांचे सुभाषनगरमध्ये घर असून, २५ डिसेंबर रोजी ते कवठेमहांकाळ तालुक्यातील आपल्या मुळगांवी गेले होते. गेल्या आठवडाभरापासून घराचा दरवाजा बंदच होता. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. आतील कपाटात ठेवलेली २० हजार रुपयांची रोख रक्कम, १५ ग्रॅमचे सोन्याचे टॉफ्स, प्रत्येकी पाच ग्रॅमच्या दोन सोन्याच्या चेन, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि चांदीचे तीन पैजण असा २ लाख, ९६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.