दवाखाना नेहमी कुलूपबंद; जनावरांना उपचार मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले; तात्काळ कायमस्वरूपी डॉक्टर द्या-कलाप्पा शिंग
सोन्याळ/वार्ताहर
जत तालुक्यातील सोन्याळ येथील स्थानिक वर्ग एक श्रेणीतील पशुवैद्यकीय दवाखान्यात गत चार महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने कुलूपबंद आहे. लाखो रुपये खर्चून सुसज्ज असे नवीन इमारत बांधण्यात आले आहे. परंतु डॉक्टरविना दवाखाना पोरका झाला आहे़. नावाला दवाखाना असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील जनावरांना वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आपली हजारो रुपये किमतीची जनावरे गमवावी लागत आहेत़ प्रशासनाने याकडे लक्ष देत कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी करावी अशी मागणी माजी सरपंच कलाप्पा शिंगे यांनी केली आहे़.
सोन्याळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर अशोक राठोड यांची गेल्या जून महिन्यांत त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात हिंगोली येथे बदली झाल्याने सदरची जागा रिक्त झाली आहे. यामुळे येथील दवाखान्याचा कार्यभार उमदी येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे पण तेही येथे येत नाहीत़.उमदी येथील या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उमदीसह बोर्गी दवाखान्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.त्यामुळे कामाचा मोठा ताण त्यांच्यावर पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत़. सोन्याळ येथील श्रेणी १चा पशुवैद्यकीय दवाखाना अनेक महिन्यापासून नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. सोन्याळसह परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांना यामुळे वेळेवर उपचार मिळत नसल्याने हा दवाखानाच स्वतःच आजारी पडला असून डॉक्टरविना पोरका झाला आहे. पशुसंवर्धन खात्याच्या या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून पशुधन बाळगणाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कायमस्वरूपी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी मिळविण्यासाठी अजून किती महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हा दवाखाना केंद्रस्थानी आहे. त्यामुळे परिसरातील लकडेवाडी जाडरबोबलाद, उटगी लमाणतांडा येथील पशुपालक पशुवैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी येथे येत असतात. या दवाखान्याला पाच पदे मंजूर आहेत. त्यात एक पशुवैद्यकीय अधिकारी, एक पशुधन विकास अधिकारी, दोन परिचर, एक वनोपचारक आहेत. मात्र सद्यस्थितीत या दवाखान्यात एक प्रभारी परिचर (शिपाई) असून त्यालाही माडग्याळ आणि सोन्याळ अशा दोन्ही दवाखान्याचे काम पाहण्यास सांगितले आहे. या दवाखान्याचा अतिरिक्त पदभार सध्या उमदी येथील अधिकाऱ्याकडे सोपवला असून ते कधीच इकडे फिरकत नसल्याचे सोन्याळचे माजी सरपंच कलाप्पा शिंगे यांनी सांगितले. परिणामी ५ ते १० किलोमीटरच्या खेड्यावरून उपचारासाठी आणलेल्या जनावरांना उपचार मिळणे तर दूरच परंतु स्थानिक शेतकऱ्यांच्या जनावरांनाही शासकीय वैद्यकीय सेवेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपल्या गुरांवर खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून महागडा इलाज करून घ्यावा लागतो. तरी प्रशासनाने त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे रिक्त पद भरावे, अशी मागणी पशुपालक करीत आहेत.
खाजगी डॉक्टरकडून उपचारामुळे आर्थिक संकट उभे…
सोन्याळ लकडेवाडी जाडरबोबलाद गावामध्ये दुधाळ गायीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे सोबतच गायी, म्हैस, खिलार गायी, शेळी, मेंढी यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या ठिकाणी जनावरांना अचानक काही झाल्यास कोणताही सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक जनावरे दगवलेची घटना घडल्या आहेत आणि शेतकरी वर्गांचे खूप मोठे नुकसान होत आहे. याठिकाणी नेमलेले डॉक्टर कधी आलेच नाहीत त्यामुळे पशुधन वाचवण्याकरिता शेतकऱ्यांना खूप मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
सरकारी नियमानुसार जनावरांचे उपचार केल्यास निश्चितच शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जनावरांना उपचार घेता येतात. परिसरात दररोज साधारण दहा हजारहुन अधिक लिटर दुधाचे संकलन होत आहे व इतर लहान-मोठी जनावरे वेगळीच आहेत एवढी मोठी संख्या असताना देखील शेतकऱ्यांच्या पदरी डॉक्टरविना निराशाच आहे. आजची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या दुधाला कोणतीही किंमत नाही दुधाचे दर पडल्यामुळे शेतकरी खूपच अडचणीत आलेला आहे.
यात अतिवृष्टी सारख्या पावसामुळे जनावरांना कोणत्या ना कोणत्या आजाराची लागण होत आहे. त्यामुळे या जनावरांचा देखभालीचा खर्च खाजगीतुन शेतकऱ्यांना करावा लागत असून तो शेतकर्यांना परवडणारा नाही. म्हणून शासनाने त्वरित या सोन्याळ गावासाठी तातडीने स्वतंत्र पशुसंवर्धनचा डॉक्टर नेमून शेतकऱ्यांची होत असलेली अडचण दूर करावी अशी मागणी केली जात आहे.