आटपाडी / प्रतिनिधी
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्याने शासन व जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आटपाडीतील मुख्य प्रशासकीय इमारतीत स्वच्छता अभियान राबविण्यासाठी खुद्द तहसीलदार मैदानात उतरले. तहसीलदारांसह अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिम राबविली.
आटपाडीतील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तहसीलसह अनेक विभागाची कार्यालये आहेत. तेथे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी स्वच्छता अभियान राबविण्याचे निर्देश सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले. महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तहसीलदार लंगुटे यांनी स्वत: मोहिमेत सहभाग घेत परिसराची स्वच्छता केली.
खुद्द तहसीलदारच स्वच्छतेसाठी आग्रही राहुन काम करत असल्याने अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही अंतर्गत आवारात स्वच्छतेला गती दिली. शासकीय कार्यालये व परिसरात स्वच्छता राखण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने सर्वच विभागांनी आपल्या कार्यालयाची व परिसराची स्वच्छता राखावी, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले. तर लोकांनीही प्रशासकीय इमारतीत अस्वच्छता पसरविण्याऐवजी ती स्वच्छ राहिल यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले.