कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड एमआयडीसीतील राधाकृष्ण ऑइल मिल कंपनीत माल उतरल्यानंतर ट्रकचालकाने हमालीचे पैसे दिले नसल्याच्या कारणातून चिडून कंपनीतील सातजणांनी मिळून रामा दशरथ सरक (वय २५,रा. मायाक्कानगर, बामनोली) या ट्रकचालकास बेदम मारहाण केली. यात ट्रकचालक जखमी झाला असून त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राधाकृष्ण कंपनीच्या आवारात हा प्रकार घडला असून याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिसांनी दोघा मालकासह पाच कर्मचारी मिळून सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ट्रकचालकाने कंपनी मालकांना व कर्मचाऱ्यांना शिविगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केल्याने व्यवस्थापनानेही चालकाविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.