प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडु नये, अशा व्यक्ती घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जावी असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. होम आयसोलेशनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सांगली ग्रामीण, पलूस, भिलवडी, कडेगाव अशा विविध ठिकाणी कारवाई करुन 5 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात आज अखेर 2734 नागरिक तसेच 3 पोलीस अधिकारी व 8 पोलीस अमलदार यांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. यावर नियंत्रण व पेट्रोलिंग करण्यासाठी बीट मार्शलांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीट मार्शलांमार्फत होम आयसोलेशन असलेल्या नागरिकांना भेटुन घराच्या बाहेर न पडण्याबाबत सक्त सुचना देण्यात आल्या आहेत. तरीही सदरचे आदेश न जुमनता बाहेर फिरणाऱ्या सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील 1, पलूस पोलीस ठाणे हद्दीतील 2, भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील 1, कडेगाव पोलीस ठाणे हद्दीतील 1 अशा एकुन 5 जणांवर कलम 188, 269, 270 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 प्रमाणे कलम 51 बी व कोव्हीड योजना 2020 या नियम 11 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तरी होम आयसोलेशन असलेल्या व्यक्तींनी शासकीय नियमांचे पालन करावे. त्याच बरोबर सर्व नागरिकांनी कोव्हीड – 19 या आजारावर मात करण्यासाठी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंन्सींग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, विनाकारण घराबाहेर पडु नये, प्रशासनास सहकार्य करावे, नियमाचे पालन करावे, असे आवाहन करुन जे नागरिक नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल. असेही जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम यांनी सूचित केले आहे.