शिराळा / वार्ताहर
सागाव (ता.शिराळा) येथील गाडी चोरी प्रकरणी संशयित आरोपी धनंजय रंगराव कुंभार (वय २०) रा.मांगले (ता.शिराळा) यास अटक करण्यात आली आहे. सदर घटना मंगळवार दि.५ रोजी सकाळी घडली याबाबत जगन्नाथ शंकर पाटील रा.सागाव (वय५५) यांनी शिराळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, काल मंगळवारी सकाळी मांगले, सागाव रोडवरुन जगन्नाथ पाटील यांची एमएच १० सीजे २३१२ हि गाडी चोरीला गेलेली होती. याबाबत जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून १ पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली मांगले, चिखली, सागाव व नाटोली या ठिकाणी तपास केला असता नाटोली येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी आढळून आला. त्यास ताब्यात घेतले असता संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार कालिदास गावडे, विनोद जाधव, हरेश पितळे, नितीन घोरपडे, दिपक हांडे, अमर जाधव, गणेश झांझरे यांनी केला. पुढील तपास दिपक हांडे करत आहेत.