प्रतिनिधी/ सांगे
सांगे नगरपालिकेचा प्रभाग 1 बामणसाय-गुण्याभाट हा पालिका संचालनालयाने यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी राखीव केल्याने तेथील काही मतदारांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रभागात अनुसूचित जमातींची मतदारसंख्या नसताना प्रभाग राखीव केला गेला असून यामागे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने ही राखीवता त्वरित रद्द करावी, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.
अनुसूचित जमातींचे मतदार नसताना प्रभाग राखीव करून सरकारने आमच्यावर अन्याय केला असून आम्ही कोणत्याही परिस्थितीत बाहेरचा उमेदवार आमच्यावर लादून घेणार नाही. वेळेप्रसंगी मतदानावर बहिष्कार घालू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. बामणसाय-गुण्याभाट म्हणजे प्रभाग 1 मधील बरेच मतदार शनिवारी सकाळी एकत्र येऊन त्यांनी सदर राखीवतेवर संताप व्यक्त करून भरपूर समाचार घेतला. कुणाला तरी खूष करण्यासाठी हा प्रभाग राखीव ठेवण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नपेक्षा सरकारने कोणत्या निकषांवर हा वॉर्ड अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवला आहे ते स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गेल्या निवडणुकीत प्रभाग 7 हा अनुसूचित जमातींसाठी राखीव होता. यावेळी हे आरक्षण प्रभाग 8 मध्ये सरकवायला हवे होते. पण तसे करण्यात आलेले नाही. प्रभाग 9 ही आरक्षित झालेला नाही. प्रभाग 10 मध्ये अनुसूचित जमातींतील मतदारांची संख्या जास्त असून योग्य असूनही तो राखीव न ठेवता चक्क वॉर्ड 1 अनुसूचित जमातींतील मतदारांची संख्या नसताना सरकारने राखीव बनविल्याची टीका यावेळी करण्यात आली. यामागे राजकारण असून बाहेरचा उमेदवार आमच्यावर लादण्याचा प्रयत्न आहे, असा दावा या ग्रामस्थांनी केला. सरकारने जनमताची कदर करून सदर राखीवता रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सरकारने विनाकारण आमच्यावर जबरदस्ती करू नये. हा प्रभाग का म्हणून अनुसूचित जमातींसाठी राखीव करण्यात आला आहे, त्या समाजातील मतदार नसताना राखीवता का, असे सवाल करताना एका महिला मतदाराने, सरकार एसटी कोटय़ातून आमच्या मुलांना नोकऱया देणार काय, असा संतप्त प्रश्न केला. पालिका प्रशासनाने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी सदर ग्रामस्थांनी या पत्रकार परिषदेतून केली. यावेळी जार्विस फर्नांडिस, डायगो डिकॉस्ता, एलिना फर्नांडिस, पीटर मास्कारेन्हस व प्रभागातील अन्य मिळून सुमारे 50 नागरिक हजर होते.