कार्यकर्ते-समर्थकांच्या आग्रहास्तव निर्णय, सर्वत्र मिळणारा प्रतिसाद पाहता लोकांना बदल हवा असल्याचे स्पष्ट
प्रतिनिधी/ सांगे
सांगे मतदारसंघासाठी सावित्री बाबू कवळेकर यांनी अपक्ष म्हणून मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. सांगेचे निर्वाचन अधिकारी पांडुरंग तळगावकर यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला. यावेळी साहाय्यक निवडणूक अधिकारी राजेश साखळकर उपस्थित होते. यावेळी दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष नवनाथ नाईक, नगरसेवक मेशू डिकॉस्ता, संगमेश्वर नाईक उपस्थित होते. कोविड नियमांचे पालन करताना निवडणूक अधिकाऱयांनी कडक धोरण अवलंबवून उमेदवारांसोबत फक्त दोन समर्थकांना प्रवेश दिला. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या सोबत आणलेल्या अन्य समर्थकांना चार हात दूर राहावे लागलें.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावित्री कवळेकर म्हणाल्या की, सांगे मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून यंदाची निवडणूक लढवत आहे. माझे असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांच्या आग्रहास्तव हा निर्णय घ्यावा लागला. वास्तविक सांगे मतदारसंघासाठी मी नवीन नाही. मागील विधानसभा निवडणूक मी लढवून निर्णायक मते घेतली होती. पण मी पराभवाने खचून न जाता गेली पाच वर्षे समाजसेवेचे कार्य चालूच ठेवले. कोविड महामारीच्या पहिल्या आणि दुसऱया टप्याच्या काळात मी कशी सक्रिय होते ते सर्वांनी पाहिलेले आहे. माझ्या कार्याने प्रभावित होऊन गेल्या पाच वर्षांत अनेक कार्यकर्ते आणि अन्य लोकांची साथ मला लाभली. आज माझ्या विजयासाठी ते झटत आहेत. माझा स्वभाव मुळात कुणालाही दुखावण्याचा नाही. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्यावर मी भर देत असते, असे त्यांनी सांगितले.
सांगेसाठी व्हिजन घेऊन काम
सांगे मतदारसंघासाठी मी एक व्हिजन घेऊन काम करत आहे. सध्या विकासाची कामे ठप्प पडलेली आहेत. बेकारी वाढत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे या मतदारसंघाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. म्हणूनच सर्वांच्या आग्रहास्तव अपक्ष म्हणून मी निवडणूक लढवत आहे. प्रचाराच्या वेळी सर्वत्र मला मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा आणि प्रतिसाद मिळत आहे. थंडपणे काम करणे हा माझा स्वभाव आहे. सूडबुद्धीने मी वागत नाही. त्यामुळे सावित्री कवळेकर हा एकमेव पर्याय आहे, असे त्या म्हणाल्या.
लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध करणार
मतदारांनी इतरांची आमदार म्हणून कारकीर्द पाहिली आहे. आता वेळ आली आहे की, त्यांनी एक वेळ मला संधी द्यावी. मी या संधीचे सोने करेन आणि लोकांच्या विश्वासाला पात्र राहीन, असे आश्वासन कवळेकर यांनी दिले. सांगे मतदारसंघासाठीचा जाहीरनामा मी लवकरच प्रसिद्ध करणार आहे. त्यातून मी काय करू इच्छिते हे मतदारांना कळणार आहे. मी एक महिला उमेदवार असल्याने महिलांचे दुःख ओळखू शकते. सांगेच्या महिला आमदार बनण्याचे भाग्य मला द्या, असे कळकळीचे आवाहन कवळेकर यांनी याप्रसंगी मतदारांना केले.
लोकांना बदल हवा
मी अपक्ष जरी असले, तरी आजवरचे माझे कार्य आणि मतदारसंघाप्रती असलेली माझी तळमळ व जिद्द पाहून पक्षभेद विसरून मला मतदान करून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदारसंघात मतदारांकडून जो प्रतिसाद मिळत आहे तो पाहता लोकांना बदल हवा आहे हे स्पष्ट दिसून येते, असे त्या म्हणाल्या. प्रचाराच्या वेळी आपल्याबरोबर भरारी पथक लावून दिले जाते. पण विरोधक उमेदवार कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन फिरतात. ते चालते. आपण कुणावरही तक्रार करत नाही. अफवा पसरवून, अपप्रचार व इतरांची बदनामी करून कोणी मोठा होत नाही असे आपण मानते. कोविडचे निर्बंध सर्वांनी पाळायचे असतात. कोविडच्या काळात लोकांच्या मदतीसाठी मी स्वतः धावून गेले. त्याची मतदार आठवण करून देतात. जनतेचा पाठिंबा आपल्या पाठीशी आहे, असा दावा कवळेकर यांनी केला.
स्थानिक पत्रकारांनाही अटकाव
दरम्यान, अर्ज भरणाऱया उमेदवारांची छायाचित्रे घेऊ पाहणाऱया आणि माहिती संकलन करू पाहणाऱया स्थानिक पत्रकारांना सुद्धा अटकाव करण्यात आला. लोकशाहीचा चौथा स्तंभ असूनही पत्रकारांना निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट न करता प्रथमच अशा प्रकारे निवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रियेची सुरुवात जर अशा प्रकारे होत असेल, तर यापुढे वार्तांकन करणे कठीण होणार आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱयांनी निवडणूक प्रक्रियेत पत्रकारांना सामावून घेणे गरजेचे आहे, असे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. समाजाचे प्रतिनिधी म्हणून काम करणाऱयांना जर अशा जांचक अटी लावून निवडणूक प्रक्रियेपासून लांब ठेवले जात असेल, तर ते योग्य नाही, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.