सावित्री कवळेकर यांचा आज पासून प्रचार
प्रतिनिधी /सांगे
भाजपने अजूनही अधिकृतरित्या सांगे मतदारसंघाची उमेदवारी घोषित केलेली नाही. असे असले तरी सांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी काल सोमवारी सांगेचे आराध्य दैवत श्री पाईकदेव देवस्थानात देवाला नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या राज्य महिला मोर्चा उपाधाक्षा सावित्री बाबू कवळेकर या आपल्या समर्थकासह आज मंगळवार दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता सांगेचे आराद्य दैवत श्री. पाईकदेवाचा आशीर्वाद घेऊन सांगे मतदारसंघात प्रचार कार्याला प्रारंभ करतील. यावेळी सावित्री कवळेकरांसाठी निवड करण्यात आलेल्या विविध समितीचे कार्यकर्ते, हितचिंतक, शिवाय सावित्री कवळेकर हिच्या समर्थकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन नवनाथ नाईक यांनी केले आहे
श्री फळदेसाई यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, माजी नगराध्यक्ष संजय रायकर, रिवणचे सरपंच सूर्या नाईक, उगेंचे सरपंच उदय देसाई, पंच भारती नाईक, मंडळ अध्यक्ष बायो भंडारी, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुवर्णा जांबावलीकर सर्व बुथ अध्यक्ष विविध समितीचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना फळदेसाई म्हणाले की, पक्षश्रे÷ाrंनी आपल्याला पुढे जायला सांगितले आहे. आज किमान सांगे नगरपालिका क्षेत्रातील तीनशे घरांना भेट दिली. यावेळी मतदारांनी आपल्याला पुढे जायला सांगितले आहे. प्रचार करताना कोविड च्या नियमांचे काटेकोर पणे पालन करण्यात येईल. सांगे मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्ते झटणार आहे. तसेच गोव्यात ही पुन्हा भाजपाचे सरकार येणार आहे अशी आशा फळदेसाई यांनी व्यक्त केली.
श्री. फळदेसाई यांना भाजपाचे तिकीट मिळाले आणि सावित्री कवळेकर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभी राहिली तर भाजपाला याचा फटका बसेल का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ही लोकशाही आहे आणि कोणालाही निवडणुकीत उभे राहता येते जे काही कार्यकर्ते पक्षाला सोडून गेले आहेत, त्यांचा कुठलाही फटका भाजपला बसणार नाही. दरम्यान, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आणि एकूणच मतदार संभ्रमात पडल्याचे दिसून आले.