वास्कोत काम करणारा मुगोळी ग्रामस्थ पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / सांगे
कोरोनाचा सांगे तालुक्यातील पहिला रुग्ण शुक्रवारीच सापडला. सांगे शहरापासून जवळच असलेल्या मुगोळी भागात कोरोनाचा हा रुग्ण आढळला असून तो वास्को येथील आरोग्य केंद्रामध्ये कामाला आहे. गुरुवारी त्याची अन्य कर्मचाऱयांच्या बरोबर चाचणी घेण्यात आली असता अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्याला मडगावात कोविड इस्पितळात भरती करण्यात आले.
वास्को येथील आरोग्य केंद्राचा कर्मचारी असलेला सदर इसम दररोज सांगे ते वास्को असा प्रवास करायचा. गुरुवारी घरी येताना तो कुडचडे येतील एका नामांकित व मोठय़ा किराणामालाच्या आस्थापनामध्येही गेला होता, अशी माहिती मिळाली आहे. वास्को भागात कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात सापडत असून सांगे येथे मिळालेला रुग्णही त्याचाच परिणाम आहे.
शुक्रवारी सकाळी मुगोळी गावात ही वार्ता पसरल्यानंतर लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सदर व्यक्ती कुटुंबियांसोबत न राहता वेगळय़ा घरात वास्तव्यास होती. या रुग्णाच्या घरातील कुटुंबियांना कोरोनाच्या तपासणीसाठी नेण्यात आलेले असून त्याच्या संपर्कात अन्य जे कोणी आलेले आहेत त्यांचा शोध घेणे चालू आहे. सांगे शहर व तालुक्मयाच्या अन्य भागांतून अनेक लोक वास्को येथे कामाला जात असतात. त्यांनी खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
कुर्डी येथे आलेल्या लोकांना पिटाळले
दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी साळावली जलाशयाच्या पाण्याखाली एरव्ही बुडणाऱया, पण मे-जूनमध्ये पाणी सुकल्यानंतर फिरता येणाऱया कुर्डी गावात मौजमजा करण्यासाठी वास्को येथून काही युवक-युवती तसेच इतर भागांतूनही लोक आल्याची माहिती सांगेच्या प्रशासनाला मिळताच उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी आपल्या पथकासह तेथे भेट दिली आणि सदर लोकांना समज देऊन पिटाळून लावले. तसेच संबंधित यंत्रणेला कारवाई करण्याचे आदेश दिले. सांगे भागात सुरुवातीपासून कोरोनासंदर्भात प्रशासकीय यंत्रणा सक्रिय राहिली असून सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. लोकांनीही आवश्यक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे