गेल्या वर्षीच्या प्रयोगातून प्रेरणा, सांगे विभागातील 2.6 हेक्टर, तर केपे विभागातील 5 हेक्टर क्षेत्र झेंडूच्या लागवडीखाली
प्रतिनिधी /सांगे
गेल्या वषी झेंडू फुलांच्या (मेरी गोल्ड) लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्याने यावषी सांगे आणि केपे विभागांतील शेतकरी मोठय़ा प्रमाणात झेंडू लागवडीत उतरले आहेत. झेंडू हे नगदी पीक असून दसरा आणि दिवाळीला मोठय़ा प्रमाणात झेंडूच्या फुलांना मागणी असते. झेंडू लागवडीकडे महिलांचा जास्त कल असून स्वयंपूर्णतेकडे उचललेले हे एक पाऊल आहे. एकेकाळी केवळ मिरची आणि भाजी लागवडीपुरत्या मर्यादित असलेल्या ठिकाणी झेंडूची आज व्यावसायिक तत्त्वावर लागवड होत आहे.
गेल्या वषी सांगे आणि केपे विभागांत झेंडू लागवडीसाठी कृषी खात्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. आत्मा अर्थात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सीच्या अंतर्गत शेतकऱयांना तसेच स्वयंसाहाय्य गटांना प्रात्यक्षिक म्हणून झेंडू लागवडीकडे आकर्षित करण्यात आले. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. चांगले पीक आले आणि चार पैसे महिलांच्या हाती आले. गेल्या वषी दसरा व दिवाळीला सांगे, केपे, कुडचडेच्या बाजारपेठांत ही फुले विकण्यास आली. त्यामुळे बरीच उलाढाल झाली. यावषी देखील महिलांनी चांगला रस दाखविला असल्याचे सांगेच्या विभागीय कृषी अधिकारी गौरी प्रभुदेसाई यांनी सांगितले.
सांगली येथून रोपे आणली
यंदा झेंडूची रोपे प्रत्येकी चार रु. एक रोप याप्रमाणे शेतकऱयांना उपलब्ध करून दिली आहेत. एकूण 26240 रोपांची लागवड करण्यात आली असून सुमारे 2.6 हेक्टर क्षेत्र झेंडू लागवडीखाली आले आहे. तर 70 शेतकरी यात गुंतले आहेत. सांगे येथील शेतकऱयांना यंदा सांगली येथून आणलेली ‘अष्टगंधा’ ही केसरी रंगाची व ‘येलो स्पॉट’ ही पिवळय़ा रंगाची संकरित जातीची रोपे पुरविण्यात आली आहेत. दसरा हा उत्सव समोर ठेऊन वेळेवर लागवड करण्यात आली आहे, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.
45 दिवसांत पीक यायला सुरुवात होते. दसऱयाच्या वेळी ऐन भरात हे पीक येते. यंदा शेतकऱयांकडून उत्तम प्रतिसाद लाभला असून अजूनही रोपांसाठी मागणी असल्याचे त्या म्हणाल्या. याशिवाय झेंडूची बियाणे आणण्यात आली असून काही युवा शेतकऱयांची रोपवाटिका निर्माण करण्यासाठी निवड केल्याचे प्रभुदेसाई यांनी सांगितले. झेंडूचे बेणे निर्माण करून स्वयंपूर्ण बनण्याचा दृष्टीने उचललेले हे पाऊल आहे. गेल्या वषी सांगे विभागात 15 हजार झेंडू रोपांची सुमारे 16 शेतकऱयांनी लागवड केली होती.
केपेतही झेंडूची मोठय़ा प्रमाणात लागवड
गतवषी केपे विभागात 16 स्वयंसाहाय्य गटांनी प्रत्येकी 1 हजार चौरस मीटर जमिनीत मिळून 16 हजार चौरस मीटर जमिनीत झेंडूची लागवड केली होती. कृषी खात्याने आत्मा यंत्रणेमार्फत सांगली येथून झेंडूची रोपे आणून या गटांना गेल्या वषी वितरित केली होती. त्याचा चांगला परिणाम दिसून आला होता, अशी माहिती केपेचे विभागीय कृषी अधिकारी संदेश राऊत देसाई यांनी दिली आहे.
यंदा केपे विभागात झेंडूच्या 50 हजार रोपांची लागवड करण्यात आली असून एकूण 75 शेतकरी गुंतले आहेत. यामध्ये महिलांचा वाटा मोठा आहे. सुमारे 5 हेक्टर क्षेत्रात झेंडूची लागवड झाली आहे. पिवळय़ा व केसरी रंगाच्या झेंडूच्या रोपांचा लागवडीत समावेश आहे. प़ृषी खात्याने महिला शेतकऱयांना आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. कोरोनामुळे गेल्या वषी रोपांची उपलब्धता थोडी उशिरा झाल्याने लागवड सुमारे दहा दिवस पुढे गेली होती. यंदा वेळेवर रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
गोव्यात झेंडूच्या फुलांना खूप मागणी
गोव्यात फुलोत्पादनाला वाव असून मागणीही खूप आहे. झेंडूच्या फुलांना तर खूप मागणी आहे. गोव्यात झेंडू लागवडीला खूप वाव आहे. कृषी खात्याकडे 60 हजार रु. सब्सिडी देणारी योजना आहे. सजावटीकरिता झेंडूची फुले सर्रास वापरली जातात. विशेषतः कर्नाटक आणि महाराष्ट्रातून या फुलांची आयात केली जाते. गेल्या वषी केपेच्या विभागीय कृषी कार्यालयाने स्वयंसाहाय्य गटांना जी मोफत रोपे दिली होती त्यांचे पीक उत्तम प्रकारे आले. सुमारे पाच लाखांच्या घरात उलाढाल झाल्याची माहिती मिळाली आहे. सांगली येथील रोपवाटिकेतून कलकत्ता नामक जातीची ही रोपे आणण्यात आली होती. प्रत्येक स्वयंसाहाय्य गटाने 25 ते 30 हजार रुपयांचे उत्पन्न घेतल्याचे वृत्त आहे.
कमी कालावधीत उत्पन्न देणारे झेंडू हे पीक असून शेतकऱयांना ते लाभदायक ठरणारे आहे. एक हजार चौरस मीटर जागेत झेंडूची लागवड केलेल्या शेतकऱयाला सहा हजार रु. सब्सिडी कृषी खात्याकडून मिळणार आहे. गेल्या वषी 120 रु. प्रति किलो दराने झेंडूच्या फुलांची घाऊक विक्री करण्यात आली, तर झेंडू फुलांच्या माळा 50 रु. याप्रमाणे विकण्यात आल्या होत्या. एक किलो फुलांच्या चार माळा होत असून त्यानुसार प्रति किलो 200 रु. दर प्राप्त झाला होता. या शेतकऱयांना कृषी खात्याकडून सब्सिडी देखील मिळणार आहे. याव्यतिरिक्त सांगे आणि केपे भागांत स्वतः झेंडू फुलांची रोपे तयार करून कमी प्रमाणात लागवड करणारे शेतकरी आहेत. या लागवडीचा आनंद यंदा नक्कीच गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळीला पाहायला मिळणार आहे.