आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा
प्रतिनिधी /सांगे
सांगे नगरपालिका कर्मचाऱयांना गेले तीन महिने पूर्ण होऊन चौथा महिना सुरू झाला, तरी पगार न झाल्याने त्यांनी येणाऱया दहा दिवसांनंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सांगे पालिकेकडे सुमारे 22 कर्मचारी असून त्यांना गेले तीन ते चार महिने पगार झाला नसल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे.
नुकतीच 22 कर्मचाऱयांनी सांगे पालिका नगराध्यक्ष श्वेता नाईक तारी व मुख्याधिकारी मनोज कोरगावकर यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. मुख्याधिकारी कोरगावकर यांनी त्यांच्याकडे या विषयावर तोडगा काढण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली आहे.
याविषयी बोलताना लुईस फर्नांडिस म्हणाले की, गेले तीन महिने कुटुंबियांसोबत पगाराविना काढले. आता ते शक्य नाही. मुख्याधिकाऱयांनी आठ दिवसांची मुदत मागितली आहे. या आठ दिवसांत पालिका कर्मचाऱयांना पगार झाला नाही, तर पालिकेचे सर्व कर्मचारी आमरण उपोषणावर बसणार आहेत. त्यामुळे सरकारने आमचा गंभीरपणे विचार करावा.
मुख्याधिकारी कोरगावकर म्हणाले की, सांगे पालिका ‘क’ दर्जाची असल्याने केवळ भाडेपट्टी व दुकानदारांकडून येणाऱया महसुलावर चालत असते. दुकानदारांचे भाडे येणे बाकी आहे. ज्या दुकानदारांनी अजून भाडे भरलेले नाही त्यांना सात दिवसांची नोटीस पाठवण्यात येणार आहे. दुसरीकडे, पगार नाही, त्यामुळे जगायचे कसे या विवंचनेत कर्मचारी अडकले आहेत.