रूमाल्डो फर्नांडिस यांनी स्पष्ट केली भूमिका : मंडळाचा कार्यकाळ संपत आलेला असताना अविश्वास ठरावाचा प्रयत्न आश्चर्यजनक
प्रतिनिधी / सांगे
आपण पदावरून खाली उतरण्यास केव्हाच तयार होतो. मात्र पालिका मंडळाचा कालावधी संपण्यास चार महिन्यांचा अवधी बाकी असताना अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. यामागे जे कुणी राजकारण करू पाहत आहेत त्यांना ते करू द्या. आपण आपला राजीनामा मागे घेणार नाही, असे सांगे पालिकेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या रूमाल्डो फर्नांडिस यांनी सांगे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सांगेचे नगराध्यक्ष म्हणून एक वर्ष अकरा महिन्यांच्या कारकिर्दीत जनतेला चांगले प्रशासन तसेच सेवा देण्याचा आपण प्रयत्न केला. आपल्याला खुर्चीचा मुळीच मोह नाही. नगरसेवकांनी आपल्याला नगराध्यक्ष बनण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे व जनतेचे मनापासून आभार मानतो. आमदार प्रसाद गावकर यांच्या मदतीने आपण भरीव अशी विकासकामे मार्गी लावली, असे ते म्हणाले.
आपला नगराध्यक्षपदाचा ठरलेला कार्यकाळ 20 जून, 2019 रोजी संपला होता. तेव्हाही नगरसेवकांनी आपल्याला सहकार्य केले. खुर्ची सोडण्यास आपण तेव्हाही तयार होतो. सांगेच्या जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली हे आपण आपले भाग्य समजतो. सर्वांना बरोबर घेऊन आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला, असे फर्नांडिस म्हणाले.
नोटिसीची कल्पना आल्यानंतर राजीनामा
सांगेच्या जनतेला राजकारण चांगले माहीत आहे. योग्य वेळी राजकारणाचा चेहरा दिसून येईल. जे नगरसेवक पॅनल तयार करत आहेत त्यांना करू द्या. आपल्याला जेव्हा अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे कळले तेव्हा आपण त्यांची भेट घेतली. त्यावेळी तसा काही प्रस्ताव नाही असे सांगितले गेले. मात्र रात्री ठरावाची नोटीस नगरसेवकांच्या सहय़ा घेण्यासाठी फिरविण्यात येत असल्याचे कळले. त्यानंतरच आपण नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.
आपल्या कारकिर्दीत आपल्याला सहकार्य करणारे आमदार प्रसाद गावकर, उपजिल्हाधिकारी अजय गावडे, मामलेदार मनोज कोरगावकर, संयुक्त मामलेदार ऍना रिटा पायस, मुख्याधिकारी, पालिकेचे अभियंता, कर्मचारी, पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर, वनाधिकारी, पत्रकार व जनतेला मनापासून धन्यवाद देतो. कोरोनाच्या कठीण काळात नगराध्यक्ष म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. उपजल्हाधिकारी गावडे व त्यांच्या संपूर्ण पथकाने ‘कोविड-19’चा संसर्ग वाढू नये म्हणून जे कार्य केले त्याबद्दल त्यांचे आपण अभिनंदन करतो, असेही फर्नांडिस म्हणाले. काही नगरसेवकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण स्वतःला झोकून देऊन घेतलेली भूमिका आवडली नसेल, असे ते म्हणाले.
आपल्या कार्यकाळात दोन कोटींची कामे पूर्ण
आपण नगराध्यक्ष बनल्यानंतर दोन कोटी रुपयांची विविध कामे पूर्ण केली, तर दोन कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा निघाल्या असून कामाचे आदेश देणे बाकी आहे बेंडवाडा प्रभागात 36 लाखांची कामे तसेच आमडय येथे 21 लाखांचे काम हाती घेण्यात आले असून निविदा काढलेल्या आहेत. याशिवाय 14 लाख खर्चून शौचालये बांधलेली आहेत. 23 लाख खर्चून गटारावर लाद्या घातलेल्या आहेत. 12 लाख खर्चून रस्त्यावरील खड्डे बुजविलेले आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत सांगे नगर परिसर स्वच्छ केलेला आहे. याशिवाय अनेक विकासकामांना चालना दिलेली आहे, अशी माहिती फर्नांडिस यांनी दिली.
आपण कधीही पालिकेच्या कर्मचाऱयांना पगारापासून वंचित केले नाही. वेळेवर पगार दिला. लॉकडाऊनच्या काळात आपल्याला ज्या जीवनावश्यक वस्तू मिळाल्या त्यांचे वितरण देखील सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन केले. आपण आपल्या कारकिर्दीवर पूर्णपणे समाधानी आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले.