नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांची मंत्री सुभाष फळदेसाई तसेच इतर नगरसेवकांशी जुंपली, घरपट्टीचा विषय गाजला
प्रतिनिधी /सांगे
सांगे नगरपालिका मंडळाची मंगळवारी झालेली बैठक बरीच गाजून त्यात नगरसेवक मेशू डिकॉस्ता आणि स्थानिक आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई तसेच इतर नगरसेवकांमध्ये पालिका क्षेत्रातील वाढीव घरपट्टी व इतर विषयांवरून बरीच हमरीतुमरी झाली. खास करून मेशू डिकॉस्ता आणि सुभाष फळदेसाई यांच्यामध्ये बरीच जुंपली. या बैठकीत अनेक विषय चर्चेला आले. पालिका क्षेत्रातील नेहरू पार्कचा विकास करण्यावर मतदान घेण्यात आले असता 6 वि. 4 मतांनी पार्कचा विकास करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
चार नगरसेवकांना ही जागा पार्किंग लॉट करण्यासाठी हवी होती. मात्र त्यांचा प्रस्ताव बारगळला. या बैठकीत घरपट्टी विषयावर बरीच गरमागरम चर्चा झाली. पण शेवटपर्यंत कोणताच अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. नगरसेवक मेशू डिकॉस्ता आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यात यावेळी बरीच शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळाली. लोकांनी आम्हाला घरपट्टी कमी करण्याच्या मुद्यावर निवडून दिलेले आहे, असे मेशू यांनी सांगितले. फळदेसाई यांनी घरपट्टी कमी करण्याच्या बाजूचे समर्थन केले नाही. पण मेशू यांनी कोणत्याही परिस्थितीत घरपट्टी कमी करण्याचा मुद्दा रेटून धरला.
पालिकेला नुकसान करून घरपट्टी कमी का, असा मुद्दा आमदार फळदेसाई यांनी उपस्थित केला. त्यावर मेशू डिकॉस्ता यांनी घरपट्टी विषयावर पालिका मंडळ योग्य तो निर्णय घेईल असे सांगितले. पालिकेने गेल्या वीस वर्षांत घरपट्टी वाढविली नाही. ही पालिकेची चूक आहे. त्याचा भुर्दंड लोकांच्या माथी का, असा सवाल मेशू यांनी उपस्थित केला. यावेळी टाऊन हॉल मोडण्याचा विषय चर्चेस आला. लवकरच टाऊन हॉल मोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
हिंदू स्मशानभूमीच्या विकासाच्या प्रस्तावासाठी समिती
हिंदू स्मशानभूमीचा विकास करण्यावरही चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री फळदेसाई यांनी सरकारला प्रस्ताव सादर करण्यास सूचविले. स्मशानभूमीच्या विकासाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी नगरसेवक संगमेश्वर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती निवडण्यात आली असून त्यात नगरसेविका श्वेता तारी, सुप्रज तारी, मंत्री सुभाष फळदेसाई, मनोदय फडते, धर्मानंद कोसंबे इत्यादींचा समावेश आहे. ही समिती जी शिफारस करेल त्यावर त्यानंतर पालिका मंडळ अंतिम निर्णय घेणार आहे. या बैठकीत नगरसेविका श्वेता तारी यांनी उपस्थित मुद्यांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. नगरसेवक कॅरोज क्रूझ, रुमाल्डो फर्नांडिस, संगमेश्वर नाईक यांनीही आपली मते मांडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रीती नाईक होत्या. पालिकेचे मुख्याधिकारी भगवंत करमली हे हजर होते.