प्रतिनिधी / सांगे
सांगे पालिकेच्या प्रभाग 1 मधून माजी नगराध्यक्ष रूमाल्डो फर्नांडिस यांनी उमेदवारी अर्ज सांगेचे निर्वाचन अधिकारी सागर गावडे यांच्याकडे दाखल केला आहे. या पालिकेची आधीची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा प्रभाग राखीवतेसंदर्भातील निवाडा उचलून धरल्याने रद्द झाली होती. फर्नांडिस हे प्रभाग राखीवतेवरून उच्च नयायालयात गेले होते. पूर्वी हा प्रभाग अनुसूचित जमातींकरिता राखीव झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता हा प्रभाग ओबीसीकरिता राखीव झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी फर्नांडिस यांचे अनेक समर्थक उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हजर होते. आपण लोकाग्रहास्तव तसेच त्यांचे समर्थन लाभल्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपल्या कार्याची मतदारांना ओळख असून त्यांच्या मतानुसार आपण राखीवतेवर उच्च न्यायालयात दाद मागितली होती, असे फर्नांडिस यांनी सांगितले. आपण नगराध्यक्ष असताना अनेक कामे मार्गी लागली. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात जिवाची पर्वा न करता नगराध्यक्ष या नात्याने आपण प्रशासनाबरोबर कार्य केलेले आहे, याची त्यांनी आठवण करून दिली. गरजू लोकांना त्यावेळी जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा केला. ते जनता विसरलेली नाही, असे ते म्हणाले. आपल्या कार्याची पावती लोक देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.