प्रतिनिधी / सांगे
सांगे नगरपालिका प्रभाग 1 मधील मतदारांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे जोरदार स्वागत केले असून अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवलेल्या या प्रभागाची राखीवता रद्द केल्याबद्दल न्यायदेवतेचे आभार मानले आहेत. सरकारने या निकालातून निदान बोध घेऊन परत असल्या प्रकारचा अन्याय कोणत्याही प्रभागावर करू नये अशी मागणी येथील मतदारांनी केली आहे.
केवळ राजकीय सूड घेण्यासाठी सांगे नगरपालिका प्रभाग 1 मध्ये पाच टक्के सुद्धा अनुसूचित जमातींतील मतदारसंख्या नसताना आपला प्रभाग अनुसूचित जमातींसाठी राखीव करण्यात आला. याची कल्पना स्थानिक मतदारांना दिल्यानंतर मतदारांनी या अन्यायाच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली होती. अखेर मतदारांना हवा तसा निकाल न्यायालयाने दिल्याबद्दल मतदारांनी एकत्र येऊन न्यायदेवता आणि याकामी सहकार्य करणाऱयांचे आभार मानताना जो विश्वास आपल्यावर दाखविला आहे त्याबद्दल मतदारांचे आपण प्रथम आभार मानत असल्याचे रूमाल्डो फर्नांडिस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना स्पष्ट केले.
सरकार नव्हे, तर न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास होता. म्हणून राखीवतेच्या विरोधात रूमाल्डो यांना न्यायालयात दाद मागण्याची सूचना मतदारांनी केली होती. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आनंद होत आहे, असे सांगून, यापुढे सांगेच नव्हे, तर इतर कोणत्याही गावातील मतदारांवर अशा प्रकारचा अन्याय करू नये हा धडा न्यायालयाने घालून दिल्याबद्दल उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक महिला मतदार केसिल्दा मास्कारेन्हस यांनी आभार मानले. यावेळी इतर महिला, पुरुष मतदारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आणि सरकारला योग्य चपराक दिली असल्याची भावना व्यक्त केली.