सदरचा रुग्ण मुंबईहून आला असल्याची माहिती
सांगोला/प्रतिनिधी
तालुक्यातील पाचेगाव खुर्द येथील इसम आपल्या कुटूंबासह मुंबईहून गावी आला होता. सदरचे कुटुंब रेड झोन मधून आल्यामुळे त्यांचे राजुरी येथे विलगीकरण केले होते. सदर कुटुंबातील एकास सर्दी, खोकला, ताप व धाप लागणे अशी लक्षणे दिसून आल्यामुळे त्याची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्या चाचणीमध्ये सदरचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.
तालुक्यातील पाचेगाव खुर्द येथील एक इसम त्याच्या कुटुंबासह मुंबई विक्रोळी येथून दिनांक 14 मे 2020 रोजी आवश्यक त्या परवानगीसह सांगोला तालुक्यातील मौजे पाचेगाव खुर्द मिसाळवाडी या गावी आले. तालुक्यात आल्यानंतर रेड झोन मधून आल्यामुळे सदरच्या इसमास व त्यांच्यासोबत आलेल्या 13 लोकांना गुरुकुल विद्यालय राजुरी ता. सांगोला येथे संस्थात्मक विलगीकरण करून ठेवण्यात आलेले होते. त्यानुसार सदरची व्यक्ती गुरुकुल विद्यालय राजुरी येथे दिनांक 14 मे 2020 पासून रहिवास करत होती. त्यानंतर दिनांक 17 मे 2020 रोजी त्यापैकी एका इसमास सर्दी खोकला ताप व धाप लागणे अशी लक्षणे दिसून आल्यामुळे त्यास सोलापूर येथे करोना विषयक तपासणीसाठी पाठवण्यात आले. तेथे ही तपासणी केल्यानंतर सदर इसम कोरोना विषयक चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आला.