नोटीस बजावल्याने काम सुरू : हालगा क्रॉसजवळ 19 एकर जागेत प्रकल्प
बेळगाव : शहरात पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, वापरण्यात आलेले सांडपाणी नदी, नाले व गटारीद्वारे सोडले जाते. त्यामुळे महापालिकेच्यावतीने हालगा येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत असून, हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम करण्यास प्रारंभी विरोध झाला होता. हालगा येथे पिकावू शेतजमिनीचे संपादन करून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. 19 एकर जागेमध्ये या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. 70 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. सध्या सांडपाण्याचे प्रमाण वाढले आहे. नदी, नाले आणि गटारीद्वारे वाहणारे सांडपाणी बळ्ळारी नाल्याद्वारे नदीत मिसळत असल्याने पाणी दूषित बनत आहे. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली होती. याबाबत अनेकवेळा महापालिकेला नोटीस देखील बजावली होती. पाणीपुरवठा आणि गटार व ड्रेनेज नियोजनाचे कामकाज पाणीपुरवठा मंडळाकडे सोपविण्यात आले होते. पण पाणीपुरवठा मंडळाने केवळ पाणीपुरवठ्याची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे ड्रेनेज व गटार नियोजनाचे कामकाज महापालिकेतर्फे करण्यात येत होते. परिणामी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत नव्हती. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सातत्याने नोटीस बजावून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची सूचना केल्याने हा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
दररोज 70 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणार
हालगा क्रॉसजवळ 19 एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या ठिकाणी चार मोठमोठ्या आकाराच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अन्य कामकाज देखील सुरू आहे. पाणीपुरवठा मंडळाच्या देखभालीखाली हे काम सुरू आहे. दररोज 70 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्रक्रिया करण्यात आलेले सांडपाणी वापरण्यासाठी दिले जाणार आहे. तसेच सदर पाणी शेतकऱ्यांना पुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. प्रकल्पाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, प्रकल्पाकडे ये-जा करण्यास पाणीपुरवठा मंडळाने बंदी घातली आहे. मात्र हा प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाईल अशी माहिती पाणीपुरवठा मंडळाकडून उपलब्ध झाली आहे. हा प्रकल्प उभारल्यास सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्याची शक्यता आहे.