कंग्राळी बुद्रुक येथे नागरिक-भक्तांच्या अंगावर सांडपाण्याचे शिंतोडे
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
येथील बाहेर गल्लीतील रहिवाशांचे सांडपाणी रस्त्याला गटारी नसल्याने तलावाच्या बाजूने गेलेल्या रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे खड्डे पडून सांडपाणी नागरिकांच्या अंगावर उडून कपडे खराब होत आहेत. सांडपाणी तलावामध्ये मिसळून पाणीसुद्धा हिरवेगार बनले आहे. ग्रा. पं. ने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन गटारी खोदून पाण्याचा निचरा करावा. अन्यथा नागरिकांना मोर्चाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
बाहेर गल्लीतील तलावाला लागून असलेल्या गल्लीमध्ये ग्रा. पं. ने गटारींची खोदाई न केल्यामुळे नागरिकांनी आपले सांडपाणी चक्क रस्त्यावरच सोडले आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱया पै-पाहुण्यांना किंवा गावच्या नागरिकांना सांडपाण्यातूनच गावात प्रवेश करावा लागत आहे. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने मागील वषीच डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून खड्डय़ांमध्ये सांडपाणी साचून डबकी तयार झाली आहेत. यामुळे वाहनधारकांना व पादचाऱयांना या सांडपाण्यातून ये-जा करावी लागत आहे.
ग्रामदैवत कलमेश्वर देवस्थानला अलोट गर्दी
गावचे जागृत ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिरच्या दर्शनासाठी दर सोमवारी तालुक्यातील अनेक भक्त येत असतात. या भक्तांना गावच्या प्रवेशद्वारावरील तलावाच्या बाजूने गेलेल्या रस्त्यावरून वाहत असलेल्या सांडपाण्याचे दर्शन घेऊनच कलमेश्वर देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी जावे लागत आहे. देवदर्शनासाठी स्वच्छ कपडे, साडय़ा परिधान करून आलेल्या भक्तांना सांडपाण्याचे शिडकावे स्वीकारून मंदिरमध्ये जावे लागत असल्यामुळे भक्तांमधून संताप व्यक्त होत आहे. ग्रा. पं. च्या या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याच्या प्रतिक्रिया काहींनी ‘तरुण भारत’शी बोलताना मांडल्या.
तलाव सौंदर्यीकरणाचा लाखोंचा निधी पाण्यात
मागील वषी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निधीतून लाखो रुपये खर्चून कंग्राळी बुद्रुक गावाजवळील तलाव व किगदी तलाव या दोन्ही तलावांचे सौंदर्यीकरण करण्यात आले. परंतु, गावाजवळील तलावामध्ये बाहेर गल्ली व लक्ष्मी गल्लीतील नागरिकांचे सांडपाणी चक्क तलावामध्ये मिसळत असल्यामुळे पाणी हिरवेगार बनले आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला असून शासकीय अधिकाऱयांनी पाण्याची स्वच्छता करून तलावाचे सौंदर्यीकरण टिकविण्याची मागणी पर्यावरणप्रेमींतून करण्यात येत आहे.